राजर्षी शाहू महाराजांची १५२ वी जयंती समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेतर्फे उत्साहात साजरी
गडचिरोली, दि. २६ जून : आरक्षणाचे आद्य जनक, सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शुक्रवारी सायंकाळी गोकुळ नगर, गडचिरोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत सामाजिक न्याय, समता, शिक्षणाचा प्रसार, मागासवर्गीयांसाठी आरक्षण, स्त्री-पुरुष समानता आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या समतावादी विचारांचा वारसा जपत सामाजिक परिवर्तनासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमास संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा मायाताई लक्ष्मण मोहुर्ले, प्रदेश उपाध्यक्ष विजय देवतळे, प्रदेश सचिव किशोर नरूले, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण मोहुर्ले, महेश काळबांधे, जिल्हाध्यक्ष सुनील मोहुर्ले, जिल्हा उपाध्यक्ष किशोर देवतळे, जिल्हा सचिव योगेश गोरडवार, सुधीर मुंघांटे, नंदेश्वर कथले, माजी जिल्हाध्यक्ष राकेश पौरकर, इंजिनिअर शुभम मोहुर्ले, सिद्धार्थ मोहुर्ले तसेच संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या समतावादी, लोकहितवादी आणि परिवर्तनवादी विचारांचा समाजात व्यापक प्रसार करण्याचा तसेच शिक्षण, बंधुता, समानता, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्याय यांच्या जोपासनेसाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा दृढ संकल्प करण्यात आला.
यावेळी उपस्थितांनी, “राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला सामाजिक न्याय, आरक्षण, समता आणि शिक्षणाचा विचार आजही समाजासाठी तितकाच प्रेरणादायी असून त्यांच्या विचारांचा स्वीकार करूनच न्याय्य, समतामूलक, सुशिक्षित आणि प्रगत समाजाची निर्मिती शक्य आहे,” असे मत व्यक्त केले.



