कॅक्टस (निवडुंग) फुलला
*जवळपास सर्वच फुलझाडं हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात फुलतात मात्र कॅक्तस ऐन भर उन्हाळ्यात फुलला आहे. या फुलांकडे पाहिल्यावर आल्हाददायक वाटते.*
कॅक्टस म्हटले की, एखाद्या शोभिवंत बाल्कनीमधील कुंड्या आठवू लागतात. छोटी मोठी काटेरी झाडे व त्यांचे विविध आकार डोळ्यांसमोर उभे राहतात. याउलट फड्या निवडुंग किंवा कोरफड म्हटले की, ओसाड भागात फोफावणारी काटेरी झाडे समोर येतात. शेताच्या बांधावर गुरे आत येऊ नयेत म्हणून निवडुंगाचे फड उभे केलेले असतात. वर्षाकाठी क्वचित लाल, पिवळे बोंडे धरून फुलणारा निवडुंग लक्ष वेधून घेतो. अन्यथा त्याच्याकडे कोणाचे लक्षही जात नाही. भर उन्हाळ्यात सारी सभोवतालची झाडे वाळकी, करपून गेलेली दिसत असतानाही निवडुंग किसा हिरवागार राहतो, याकडे कधी तुमचे लक्ष्य केले आहे काय ? तीच गोष्ट कोरफडीची. तशीच गोष्ट कॅक्ट्स जातीचा इतर झाडांची असते. पाणी मिळो वा न मिळो, ती आपली हिरवीगारच असतात.

कॅक्टस हा वनस्पतीप्रकार खास करून कमी पाण्याच्या प्रदेशात, ओसाडी भागात वा वाळवंटी क्षेत्रात वाढणार आहे. जेमतेम आठ दहा इंच पाऊस जेथे पडतो तेथेही कॅक्टस वाढतात, स्थिरावतात, पसरतातही.
अन्य कित्येक वनस्पतींना हा पाऊस पुरेसा नसतो. पण कॅक्टस जातीची व्यवस्था हे जेमतेम मिळणारे पावसाचे पाणी वर्षभरच काय, पण दोन दोन वर्षे पुरवून वापरते. तिची रचनाच तशी आहे. सर्व कॅक्ट्स गोलाकार आकारात वाढतात किंवा त्यांच्यावर उभट रेषा वा खोलगट चिरा असतात. पाने असा प्रकार नसून संपूर्ण आकारच पानासारखा हिरवा दिसतो. यावरच भरपूर काटे असतात. सहसा या काटय़ांमुळे जनावरच काय पण माणूसही त्यांना हात लावायला जात नाही. त्यांचे नैसर्गिक संरक्षण हेच कारण मुळात वाढीचे प्रमाण तसे कमीच असते. मुख्य गोलाकार भागाचा छेद घेतला, तर मध्यभागी असलेला गोलाकार मगज पाण्याने भरून साठविल्याचे दिसते. वर्षात जेव्हा केव्हा पाऊस पडेल, तेव्हा मिळणारा जमिनीतील ओलावा शोषून ही वनस्पती हा साठा भरून ठेवून जपून वापरते; मग भले वर्षभर पाऊस न का पडो. पाने नसल्याने बाष्पीभवनाने पाणी उडून जाण्याचे प्रमाण कमी होते. याच कारणाने अगदी उन्हाळ्यातही या वनस्पती हिरव्यागारच आढळतात. पण दृष्टीला न जाणवणारा एक फरक मात्र झालेला असतो. त्यांची ‘जाडी’ कमी झालेली असून त्या ‘वाळलेल्या’ असतात.



