कोरोना काळात शहरी आशावर्करचे मानधनात मासिक 4000 रुपयाची वाढ
कोरोना काळात शहरी आशावर्करचे मानधनात मासिक 4000 रुपयाची वाढ
चंद्रपूर मनपाचा निर्णय
आयटकच्या बेमुदत कामबंद आंदोलनाला यश.
चंद्रपूर :—-राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोविड-19 सर्व्हेक्षण व पल्स अक्सिमिटर चाचणी, माझे कुटुंब माझी जबाबदारी ,या अभियान अंतर्गत घराघरात जाणीव जागृती आरोग्याची तपासणी करणे इत्यादी सर्वे करतांना अल्प मोबदला मिळत असून, आशावर्कर व गट प्रवर्तक महिलांना प्रतिदिन 300 रू. देण्याच्या मागणीला घेऊन आयटकचे राज्य सचिव कॉ विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात 16 सप्टेंबर पासून चंद्रपूर महानगरपालिका कार्यालयसमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते . दि 21 सप्टेंबर रोजी 6 दिवस होऊनही मनपा प्रशासनाने दखल न घेतल्याने आशा वर्कर आक्रमक भूमिका घेत थाळीनाद आंदोलन करून तीव्र नारेबाजी केली व प्रतिदिन 300 रू.दिल्या शिवाय काम करणार नाही अशी भूमिका घेतल्याने आरोग्य विभाग प्रशासन अडचणीत सापडले होते.तरीपण त्यादिवशी सायंकाळी 6 वाजता पर्यंत कुणीही दखल न घेतल्याने आशा वर्कर आक्रमक पवित्रा घेत थेट महानगर पालिका कार्यालयात घुसून आंदोलन सुरू ठेवले होते. तेव्हा मा.आयुक्त यांनी आंदोलन कर्त्या महिलांची भेट न घेताच मागच्या दारातून पोबारा केला अशी माहिती आशा वर्करला मिळताच ,आंदोलन अधिक तीव्र करत जोमाने नारेबाजी सुरू करून मनपा कार्यालयातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतल्याने प्रशासन जागा झाला व अनेक नगरसेवक, महापौर राखी कंचर्लावार,स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी रात्रौ 9 वाजता मनपा कार्यालयात भेट घेऊन संघटने सोबत चर्चा करून दि.22 सप्टेंबर रोजी मनपा कार्यालयात मा.आयुक्त यांच्या सोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे महापौर यांनी आश्वासन दिले होते.त्या अनुषंगाने मंगळवार ला रात्रौ 8 वाजता आयटकचे जिल्हा सचिव कॉ. विनोद झोडगे व 5 आशा वर्कर यांच्या सोबत चर्चा करून मा. महापौर राखी कंचर्लावार , मा.आयुक्त मोहिते सर, स्थाही समितीचे मा.राहुलजी पावडे ,गटनेते पप्पुभाऊ देशमुख व इतर नगरसेवक यांनी कोरोना काळात काम करतांना महानगरपालिका चंद्रपूर तर्फे आशा वर्कर महिलांना ऑगस्ट 2020 पासून मासिक 4000 रू. मानधन वाढ लागू करण्याची घोषणा केली व ही वाढ कोरोना काळात कामकरेपर्यंत फक्त लागू असेल असेही सांगण्यात आले .एकंदरीत केंद्रसरकारचे 1000 रू. व मनपा प्रशासनाद्वारे 4000 रू. असे एकूण 5000 रू. मिळणार असल्याने चंद्रपूर शहरातील 123 आशा वर्कर महिलांमध्ये थोडा आनंद निर्माण झाला आहे. यावेळी आयटक संघटनेचे नेते कॉ विनोद झोडगे यांनी मनपा प्रशासनाचे आभार मानून कामबंद आंदोलन मागे घेतले. यावेळी आशा वर्कर संघटनेच्या शहर सचिव प्रतिमा कायारकर, प्रेमिला बावणे, सविता गटलेवार, वैशाली जुपाक्का ,उषा उराडे, सोनाली हजारे, यासह सर्वच आशा वर्कर उपस्थित होत्या.



