ऑटोरिक्षा चालकांना म्हाडाच्या माध्यमातुन घरे प्रदान.
auto file photo http://vidarbh24news.com/
ऑटोरिक्षा चालकांचे घरांचे स्वप्न पुर्ण झाल्याचा मनापासून आनंद – आ. सुधीर मुनगंटीवार
ऑटोरिक्षा चालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी प्रयत्नांची शर्थ करणार
शंभर ऑटोरिक्षा चालकांना म्हाडाच्या माध्यमातुन घरे प्रदान करण्याचा सोहळा संपन्न
ऑटोरिक्षा चालकांना 10 लक्ष रू. किंमतीची घरे 4.50 लक्ष रू. किंमतीत मिळण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले व आज ती घरे ऑटोरिक्षा चालकांना प्रदान करताना मला मनापासून आनंद होत आहे. मी अर्थमंत्री असताना ऑटोरिक्षा चालकांसाठी एक कल्याणकारी मंडळ स्थापन करण्याची घोषणा मी अर्थसंकल्पात केली. त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. हे मंडळ स्थापन करण्याची प्रक्रिया अद्याप जारी आहे, परंतु विधानसभेत संसदीय आयुधांचा वापर करून हे मंडळ स्थापन करण्यासाठी मी प्रयत्नांची शर्थ करेन अशी ग्वाही माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर येथील म्हाडा कॉलनीत ऑटोरिक्षा चालकांना घरे प्रदान करण्याच्या सोहळयात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांनी विशेष बाब या सदराखाली 100 ऑटोरिक्षा चालकांना 10 लक्ष रू. किंमतीची घरे 4.50 लक्ष रू. किंमतीत देण्यात आली आहे. ही घरे बांधून पूर्ण झाली असून आज ती आ. मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत ऑटोरिक्षा चालकांना सुपुर्द करण्यात आली. ऑटोरिक्षा चालकांच्या या घरांच्या वसाहतीला कै. चांगुणाबाई मुनगंटीवार कॉलनी असे नाव देण्यात आले आहे. यावेळी ऑटोरिक्षा चालक-मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खांडेकर, जिल्हाध्यक्ष बळीराम शिंदे, मधुकर राऊत, जाकीर भाई, जहीर शेख, सुनिल धंदरे, कुंदन रायपुरे, विनोद चन्ने, रमेश वजे, शंकर थोरात, विलास बावणे, विलास जुमडे, बंडू आवारी, बबलु बैस, असलम भाई, रवी आंबटकर, मंगेश चवरे, किशोर वाटेकर यांच्यासह म्हाडाचे श्री. चांदेकर, प्रफुल्ल बालबुधे, श्री. लोधे, श्री. चौधरी, बँक ऑफ इंडीयाचे श्री. दाभाडे, परवेज आलाम आदींची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ऑटोरिक्षा चालकांनी जेव्हाही माझी आठवण केली, त्यांच्या मागण्या माझ्यासमोर ठेवल्या तेव्हा तेव्हा मी पूर्ण शक्तीनिशी मदत करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मी फक्त आमदार होतो त्यावेळी ऑटोरिक्षा चालकांवरील व्यवसायकर रद्द करविला. 2013 मध्ये वाहन करात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन निर्णय सुध्दा निर्गमित करण्यात आला होता. मी विधानसभेत हक्कभंग दाखल करत हा निर्णय मागे घेण्यास शासनाला भाग पाडले व ऑटोरिक्षावरील वाहनकर मागे घेण्यात आला. ऑटोरिक्षा चालक कर्ज घेवून व्यवसाय करतात. त्यांच्या परिश्रमावर त्यांचा व्यवसाय चालतो. चंद्रपूर जिल्हयातील माझे ऑटोरिक्षा चालक बांधव आर्थिकदृष्टया गरीब असले तरीही मनाने श्रीमंत आहे. जनतेच्या सुखदुःखात समरस होणारे ऑटोरिक्षा चालक बांधवांना आज घरे मिळत आहेत याचा मनापासून आनंद आहे. आज जरी शंभर ऑटोरिक्षा चालकांना घरे देण्यात आली असली तरीही ही फक्त सुरूवात आहे. ही राज्यातील पहिली घटना आहे. ही योजना राज्यातील प्रत्येक तालुका स्तरावरील ऑटोरिक्षा चालकांसाठी लागू व्हावी यासाठी मी विधानसभेच्या माध्यमातुन सर्वशक्तीने प्रयत्न करेन, अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र खांडेकर यांनी केले. आम्ही आजवर जी मागणी आ. मुनगंटीवार यांच्याकडे केली तेव्हा ती मागणी त्यांनी प्राधान्याने पूर्ण केली. ऑटोरिक्षा चालकांचा खरा आधारस्तंभ म्हणजे आ. मुनगंटीवार असल्याची भावना राजेंद्र खांडेकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालक मधुकर राऊत यांनी केले व आभार रमेश वजे यांनी व्यक्त केले.




