*पेटगावात अवैध दारू विक्री जोमात*
*प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष*
सावली:प्रा.शेखर प्यारमवार
सावली पासून १० कि. मी. अंतरावर असलेल्या पेटगाव गावांमध्ये अवैध देशी दारूची सर्रास विक्री जोरात सुरु असल्याचे तक्रार गावकऱ्यांनी केली आहे.काही दिवसा पहिले महिलांनी दारू बंदी साठी उठाव केला होता त्यात त्यांना दारू बंद करण्यास यश मिळाला होता. पण आता पुन्हा त्याच दारू विक्रेत्यांनी दारू विक्रीस सुरुवात केल्याने गावात दारू विक्री जोमात सुरु असल्याचे दिसून येत आहे.
युवा पिढी तरुण वयात दारूच्या आहारी जात आहेत. त्यामुळे युवकांचे जे उजळणारे भविष्य आहे ते अंधारातच जात आहे.ही चिंतेची बाब असून दारू पिणे, शिवीगाळ करणे, भांडण करणे,ही नित्याचीच बाब आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.
दिवसेंदिवस गावातील युवकांचे दारू पिण्याचे प्रमाण वाढल्याने पेटगाव गावात रस्त्याने ये-जा करणाऱ्या स्त्रियांना व विद्यार्थिनींना सुद्धा त्रास होत आहे.परंतु भीतीपोटी कोणीही तक्रार देण्यास पुढे येत नाहित. पेटगाव येथे तीन ते चार लोक अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करतात. परंतु त्यांच्या अवैध दारूविक्रीच्या कारणामुळे सामान्य माणसाला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. यासर्व गोष्टीकडे पोलीस विभाग अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असल्याची चर्चा येथील गावकऱ्यांमध्ये सुरु आहे. तसेच ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य सुद्धा या अवैध दारू विक्री कडे दुर्लक्ष करीत आहे.
यामुळे युवा पिढीचे सर्वदृष्टीने नुकसान होत आहे.अगदी १४ ते १८ वयोगटातील मुले सुद्धा दारूच्या अधीन गेले आहेत. वेळेवर प्रशासन जागे झाले नाही तर पेटगाव व परिसरातील गाव हे संपूर्ण दारूच्या पुरामध्ये बुडून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या सर्व बाबींकडे वरिष्ठांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन योग्य ती कारवाई करून पेटगाव गावात सुरु असलेल्या अवैद्य देशी व विदेशी दारू विक्री बंद करावी, अशी मागणी पेटगाव येथील महिला मंडळी व गावकऱ्यांकडून होत आहे.



