वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी
वाघाच्या हल्ल्यात गुराखी जखमी
सन २०२० मध्ये सिंदेवाही वनपरिक्षेत्रात पट्टेदार वाघाने अनेक महिला, पुरूषांचे बळी घेतले, तर अनेक शेतकरी व गुराखी यांना गंभीर जखमी केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. नुकताच दिनांक- ३०/११/२०२० ला महिन्याचे शेवटच्या दिवशी रत्नापूर बिटातील कक्ष क्रमांक ४४/२४० मधील परिसरात रत्नापूर येथील गुराखी मोरेश्वर अर्जून वलके वय ३५ वर्षे हा नेहमीप्रमाणे गावातील चराईत असलेली गुरे चरण्यासाठी चे घेऊन गेला.
गुरे चारत असता, शेजारीच दबा धरून बसलेल्या पट्टेदार वाघाने अचानक दुपारी दोन वाजताचे सुमारास मोरेश्वर वर हमला करून गंभीर जखमी केले. त्याचे ओरडण्याचे आवाजाने बाजूलाच काम करत असलेल्या व्यक्तींनी घटनास्थळी धाव घेतल्याने वाघ तिथून पळून गेला. मात्र मोरेश्वर गंभीर जखमी असल्याने विव्हळत असल्याने त्याला नवरगांव येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले. मात्र गुराखी गंभीर जखमी असल्याने त्याला तिथून सिंदेवाहीचे ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असता, तेथील डॉक्टरांनी जखमीवर प्राथमिक उपचार करून प्रकुर्ती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व मेडिकल कॉलेज चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून, त्याचेवर तेथे पुढील उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी- अरूण गोंड यांना देण्यात आली असून, वाघाचे हल्ल्याचा पुढील तपास क्षेत्रसहाय्यक हे करीत आहेत. नवरगांव उपवनक्षेत्रात दिवसेंदिवस पट्टेदार वाघाचे हल्ले वाढत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर वनपरिक्षेत्रातील नागरिकांवर व गुराख्यांवर पट्टेदार वाघाचे हल्ले वाढत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने वनविभाग अपयशी ठरत असल्याने वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांचेवर प्रश्णचिन्ह निर्माण झाले आहे. कृपया जनतेच्या जिविताची काळजी घ्यावी. व परिसरातील पट्टेदार वाघाचा त्वरीत बंदोबस्त करावा. त्यासाठी ठिकठिकाणी कॅमेरा लावावा व रस्त्याचे बाजूने तारेचे कुंपण घालून, यापुढे पट्टेदार वाघाने कुण्या नागरिकांचा जिव घेऊ नये वा गुराख्यांना गंभीर जखमी करू नये अशी एकमुखी मागणी परिसरातील जनतेची आहे.*