एमकेसीएलद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षेसाठी विनामूल्य सराव सुविधा
एमकेसीएलद्वारे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षेसाठी विनामूल्य सराव सुविधा
कोरोना महामारीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठांच्या पदवी अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्यात बहुपर्यायी-वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरुपात संगणक किंवा स्मार्टफोनवर ऑनलाईन पद्धतीने घरच्या घरी घेण्याचे धोरण सर्वसाधारणपणे निश्चित झाले आहे. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना संगणक किंवा स्मार्टफोनवरील ऑनलाईन परीक्षांचा व बहुपर्यायी-वस्तुनिष्ठ प्रश्न त्यावर सोडविण्याचा पूर्वानुभव नाही. त्यामुळे ते परीक्षेतील गुणांविषयी व यशाविषयी साहजिकच चिंतित आहेत.
अशा सर्व विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित अर्थात एमकेसीएलद्वारे अभिरूप (मॉक) ऑनलाईन परीक्षेची विनामूल्य सराव सुविधा mockexams.mkcl.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसात राज्यातील २६,००० विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे. इच्छुक विद्यार्थी संगणक किंवा स्मार्टफोनद्वारे या संकेतस्थळावर आपली जुजबी माहिती देऊन नोंदणी करू शकतात व त्याद्वारे मिळालेल्या लॉगीन व पासवर्डचा वापर करून कितीही वेळा ऑनलाईन परीक्षेचा सराव करू शकतात. ही विनामूल्य सराव सुविधा ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत उपलब्ध असेल.
सध्या या संकेतस्थळावर विद्यापीठनिहाय पदवी अभ्यासक्रमातील विषयांसंबधित चाचण्या ठेवण्यात आलेल्या नसून आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण व निर्णयक्षमता तसेच भाषिक व तार्किक कौशल्ये इ. तपासणाऱ्या सर्वसाधारण क्षमता-चाचण्या ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व विद्यापीठांच्या सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा कशी असते हे त्यावरून सहज समजेल, ती सोडविण्याचा उत्तम सराव करता येईल व त्यासंबंधीच्या काल्पनिक चिंता व भीती दूर होतील. विद्यार्थ्यांच्या संगणक किंवा स्मार्टफोनमधील कॅमेऱ्याचा विशिष्ट पद्धतीने उपयोग करून परीक्षेदरम्यान विद्यापीठाकडून पर्यवेक्षण कसे केले जाऊ शकते याचीही झलक विद्यार्थ्यांनी त्यांचा कॅमेरा चालू ठेवल्यास त्यांना मिळू शकेल.
विद्यापीठांचे विषयनिहाय सराव प्रश्नसंच सार्वजनिक आखत्यारीत (पब्लिक डोमेनमध्ये) पुनर्वितरणासाठी उपलब्ध झाल्यास ते सुद्धा विद्यार्थ्यांच्या लॉगीनमध्ये वेळोवेळी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल व विद्यार्थ्यांना त्यांचाही सराव करता येईल. या संकेतस्थळावर परीक्षेसाठी केवळ सराव सुविधा उपलब्ध असून कोणत्याही विद्यापीठाची औपचारिक अंतिम परीक्षा घेतली जाणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला भेट देऊन या विनामूल्य सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन एमकेसीएलद्वारे करण्यात आले आहे.
कृपया वरील निवेदनास आपल्या लोकप्रिय दैनिकात / माध्यमात ठळक प्रसिद्धी द्यावी व राज्यभरातील विदयार्थ्यांना सहाय्य करावे ही कळकळीची विनंती.



