*पत्रकार सृष्टीचा गाडा हाकतो त्याला सर्वांगाने ताकद देऊ व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांची ग्वाही*
*आनंदवनात रंगला कौटुंबिक स्नेहमिलन सोहळा*
वरोरा : पत्रकार हा सृष्टीचा गाडा हाकतो. पण, तो स्वतःच्या आरोग्यापासून तर मुलांचे शिक्षण व कुटुंबाच्या हितासाठी कधी फारसा विचार करू शकत नाही. त्यांच्या समस्या अत्यंत गंभीर आहेत. तुटपुंज्या वेतनातही त्याने बजावलेल्या कर्तव्यातून समाज बदलतो. मात्र तो उपेक्षित राहतो. त्यामुळे पत्रकार बांधव सर्वांगाने उभा राहिला पाहिजे, यासाठी व्हॉईस ऑफ मीडिमार्फत ताकद देऊ, अशी ग्वाही राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे यांनी दिली. कर्मवीर स्व. बाबा आमटे स्थापित वरोरा येथील आनंदवनात रविवारी दि. २ एप्रिल २०२३ रोजी अत्यंत उत्साहात पार पडलेल्या कौटुंबिक स्नेहमिलन व विमा कवच प्रदान सभारंभात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

आनंदवनातील महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सुधाकर कडू यांनी या सोहळ्याचे उद्घाटन केले. मंचावर व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, विदर्भ विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, व्हॉईस ऑफ मीडियाचे नागपूर जिल्हाध्यक्ष आनंद आंबेकर, महारोगी सेवा समितीचे विश्वस्त सदाशिव ताजणे, डॉ. विजय पोळ, ज्येष्ठ पत्रकार माधव कवीश्वर, अरूण जैन, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संजय पडोळे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

आनंदवनातील ‘स्वरानंदवन’ या दिव्यांग कलावंतांच्या आर्केस्ट्राने सुमधूर गाणी सादर करून पत्रकारांची मने रिझविली. केवळ मनोरंजन नव्हे; तर कर्मयोगी बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या कर्तृत्वाचा परिचय करून देण्यासोबतच माणुसकीची उंची वाढविणारी आणि सकलांच्या उन्नतीला बळ देणारी आशयसंपन्न गाणी सादर केली.
कौटुंबिक स्नेहमिलन सोहळ्यात प्रातिनिधीक स्वरूपात तीन पत्रकारांना १० लाखांचा विमाकवच प्रदान करण्यात आला. यासाठी जिल्हाभरातील पत्रकारांनी नोंदणी केली आहे. ही नोंदणी प्रक्रिया यापुढेही सुरू राहिल, असे आवाहन करण्यात आले.
महिला व बालकांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वांचा आनंद गगणात मावेनासा झाला होता. आनंदवनातील प्रेरणादायी आठवणी घेऊन स्नेहभोजना नंतर प्रसन्न मनाने स्पर्धेसोबतच स्नेहमिलन सोहळ्याची सांगता झाली.



