जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही- लखन साखरे
*जुन्या पेन्शनसाठी सावली तालुक्यातील हजारो कर्मचारी संपावर;*
*शाळा,महाविद्यालय,सरकारी कार्यालयात शुकशुकाट*
*एकच मिशन जुनी पेन्शन*
प्रतिनिधी: सावली चंद्रशेखर प्यारमवार
अंशदायी पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना लागू करा, या प्रमुख मागणीसाठी राज्यातील कर्मचारी संघटनेने आजपासून बेमुदत संप पुकारला आहे. या संपात सावली तालुक्यातील महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, अखिल भारतीय महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ, पुरोगामी शिक्षक समिती, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ,प्रहार शिक्षक संघटना, वनविभाग,महसूल विभाग, ग्रामसेवक संघटना,आरोग्य संघटना,भूमी अभिलेख,कृषी कर्मचारी संघटना,विदर्भ जुनिअर कॉलेज टीचर असोसिएशन अशा विविध संघटना व सर्वच शासकीय विभागातील सुमारे एक ते दीड हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत.त्यामुळे तालुक्यात शाळा व शासकीय कार्यालयात शुकशुकाट आहे.

राज्य कर्मचारी संघटनेने जुनी पेन्शन योजनेसाठी संपावर जाण्याचा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला होता. यासंदर्भात राज्याचे सचिव यांच्यासोबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठकसुध्दा झाली. या बैठकीत कोणताही तोडगा न निघाल्याने कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज संपाच्या पहिल्याच दिवशी तालुक्यातील हजारो कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, शिक्षक व शिक्षकेत्तर समन्वय समितीच्यावतीने कंत्राटी व योजना कामगार प्रदीर्घ काळ सेवेत असल्यामुळे सर्वांना समान किमान वेतन देवून सेवा नियमित करावी, नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागण्यासाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, याकडे दुलर्क्ष झाल्याने राज्य कर्मचारी संघटनेने संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे



