गुरुजी निघालेत विद्यार्थ्यांचा शोधात……..!!!!!!
•रखरखत्या उन्हात पायपीट: नोकरी वाचविण्यासाठी खटाटोप सुरू….
वणी (९ मे ):- स्पर्धेच्या युगात विद्यार्थी व पालकांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वळल्याने मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाली आहे. शाळेतील तुकडी बंद होण्याच्या मार्गावर असल्याने शाळा निर्णय कमेटीने/मॅनेजमेंट नी शिक्षकांना विद्यार्थी प्रवेशासाठी बाहेरून आणण्याची सक्ती केल्यामुळे गुरुजींना रखरखत्या उन्हात विद्यार्थ्यांच्या घरी जावे लागत आहे. आपल्याच शाळेतील शिक्षण कसे दर्जेदार आहे. 

हे पटवून देताना शिक्षक विद्यार्थ्याच्या आई-वडिलांना शर्ट आणि पँट व विद्यार्थ्यांना प्रवासाचा वेगळा खर्च, अशी प्रलोभने दिली जात आहे. इंग्रजी शाळांचे वाढते फॅड लक्षात घेता पालक व विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी माध्यमांकडे वाढल्याने मराठी शाळेत प्रवेश घ्यायला विद्यार्थी तयार नाही. त्यामुळे मराठी शाळांच्या तुकड्या कमी होण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी झाल्याने प्रसंगी शाळाही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. 

त्यामुळे शिक्षकांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याने तसेच खासगी शाळेच्या संस्थापकानेही शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या शोधात पाठविल्याची माहिती आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने लगीनघाईचा मोसम तेजीत आहे. वेळप्रसंगी शिक्षक लग्नकार्याला बगल देत नोकरी टिकविण्यासाठी दिलेल्या आदेशाचे पालन करीत प्रवेशासाठी विद्यार्थ्याच्या घरापर्यंत पोहचत आहे. आपली शाळा किती दर्जेदार आहे, हे पटवून देताना बापाला कमीज आणि मायला साड़ी व पाल्याच्या प्रवेशाचा वेगळा खर्च अशी प्रलोभने देऊन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यात येत आहे. नोकरी टिकविण्यासाठी शिक्षकांना उन्हात फिरावे लागत आहे.
उन्हाळी सुट्टयांचा परिवारासोबत आनंद घेण्याऐवजी स्वतःची नोकरी शाबूत ठेवण्यासाठी जिल्ह्यातल्या अनेक खासगी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शोधात वणवण भटकत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. नव्या शैक्षणिक वर्षांला जून महिन्यात प्रारंभ होणार आहे. 1 मे रोजी उन्हाळी सुट्र्या लागल्यानंतर जिल्ह्यातल्या अनेक खासगी प्राथमिक शाळातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शोध सुरू केला आहे. शिक्षणाचा मोफत बाल हक्क कायदा लागू झाला खरा, पण याच नियमानुसार शिक्षकांची पदे मंजूर झाली नाहीत. परिणामी स्वतःचे पद शाबूत ठेवण्यासाठी आता शिक्षकांकडून विद्यार्थ्यांची शोधाशोध सुरू आहे. 
वणी शहरात अनेक छोटय़ा-मोठ्या प्राथमिक शाळा आहेत त्यापकी हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शाळांमध्येच आवश्यक ती विद्यार्थी संख्या आहे. उर्वरित शाळांमधील शिक्षक आता विद्यार्थ्याच्या शोधात ग्रामीण भाग पिंजून काढत आहेत. इंग्रजी माध्यमांचे लागलेले वेड, काही शाळांकडून प्रवेशासाठी मिळणारे आमिष या पाश्र्वभूमीवर अनेक शाळांमधील शिक्षकांची विद्यार्थी जुळवाजुळव करताना दमछाक होत आहे. यंदा जुन्या नियमानुसार शिक्षक संचमान्यता होणार असल्याचे संकेत प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक वर्गात 30-विद्यार्थी संखेसाठी शिक्षकांची धडपड सुरू आहे.
उन्हाळी सुट्टय़ा ही शिक्षकांसाठी पर्वणी असते. पण जिल्ह्यात अजून सुट्या लागलेल्या नाहीत. एकीकडे जिल्हा परिषद शिक्षकांची ही अवस्था असताना दुसरीकडे खासगी प्राथमिक शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांच्या 35 विद्यार्थी संख्या असावी यासाठी शोधात आपली उन्हाळी सुट्टी घालवत आहेत.
शहरातील खेड्यातील खासगी शाळांतील शिक्षक या भागात विद्यार्थ्यांच्या शोधासाठी वणवण भटकत आहेत. आपल्या शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी मोफत गणवेश, निवासाची सुविधा, जादा तासिकांचे आमिष देण्यात येत आहे.



