करणवाडी ते शिबला रस्त्यासाठी अफजल खान यांचे तहसिल समोर आमरण उपोषण
• उपोषणास काँग्रेससह विविध सामाजिक संघटनांचा पाठींबा
मारेगाव 5 मे :- गेल्या अनेक वर्षा पासुन रस्त्याची दुरवस्था निर्माण झालेल्या मारेगाव तालुक्यातील करणवाडी ते झरी तालुक्यातील शिबला रस्त्याचे रुंदीकरण व डांबरीकरण करा. या प्रमुख मागणीसाठी नवरगाव येथील सामाजिक कार्यकर्ता अफजल खान युनूस खान पठाण हे 5 में पासून येथील तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले आहे.या उपोषणास काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यासह विविध सामाजिक संघटनेने आपला पाठींबा दर्शविला आहे.

मारेगाव तालुक्यातील करणवाडी,नवरगाव,सगणापूर,म्हैसदोडका,रोहपट ते झरी तालुक्याच्या हद्दीतील शिबला मार्गाचा रस्ता पूर्णतः उखडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे.हा रस्ता दूतर्फ बाजुस अरुंद असल्याने व रस्त्याची चाळणी झाल्याने किरकोळ अपघात नित्याचीच बाब झाली आहे.

तसेच रस्त्याच्या चाळणीने अनेक दुचाकीस्वारांच्या मणक्याच्या आजारात कमालीची वाढ झाली आहे.रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी परिस्थिती निर्माण होवून सुद्धा यावर प्रशासनासह लोकप्रतिनिधीचे दुर्लक्ष होत असल्याने,नवरगाव येथील सामाजिक कार्यकर्ता अफजल खान युनूस खान पठाण यांनी दखल घेत.या प्रमुख रहदारीच्या रस्त्याच्या डांबरीकरण व रुंदीकरणाच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसा पासुन लढा देत आहे.

अफजल पठाण यांनी गेल्या 8 एप्रिल रोजी या रस्त्याच्या मागणीसाठी महामहिम राज्यपाल,मुख्यमंत्री, बांधकाम मंत्री,आमदार, सार्वजनिक बांधकाम विभागासह आदींना निवेदन पाठवण्यात आले होते.तसेच रस्त्याचे काम चालू न केल्यास 5 मे पासून आपण आमरण उपोषण करू असा इशाराही निवेदनाद्वारे अफजल पठाण यांनी दिला होता.मात्र प्रशासनाने निवेदनाची कुठलीच दखल न घेतल्याने 5 मे पासुन येथील तहसील कार्यालय समोर आमरण उपोषणास बसले आहे.
उपोषणाच्या पहिल्याच दिवशी तालुका काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मारोती गौरकर,माजी जि.प.सदस्य अनिल देरकर,माजी उपसरपंच अरुण नक्षणे सह तालुक्यातील विविध सामाजिक संघटनांनी या उपोषणास आपला पाठींबा दर्शविला.



