“आम्हाला घरकुल कधी द्याल हो साहेब…..”…..

– मारेगाव येथे इतर प्रवर्गाचे लाभार्थी घरकुल लाभापासुन वंचित …
मारेगाव( 4.मार्च) :- इतर मागासवर्गीय प्रवर्गातील गरीब कुटुंबांना कायमस्वरूपी निवासी सोय उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना लागु करण्यात आली आहे. मात्र इतर मागसवर्गीय प्रवर्गातील नागरिकांचे टार्गेटच प्राप्त होत नसल्यामुळे पात्र लाभार्थी गेली अनेक वर्षे घरकुल योजनेच्या लाभापासुन वंचित आहेत.
आर्थिक जनगणेच्या सर्वेक्षण यादी मध्ये समाविष्ट नसलेल्या परंतु प्रधान मंत्री आवास योजनेचा लाभ देण्यासाठी ग्रामसभेने सुचविलेल्या नवीन ईतर मागासवर्गीय प्रवर्गाच्या कुटुंबाना गेल्या चार वर्षा पासुन मारेगाव पंचायत समितीला उदिष्टच प्राप्त झाले नाही.
त्यामुळे तालुक्यातील प्रपत्र “ड” यादी मधील शेकडो (ओबीसी )लाभार्थी योजनेच्या लाभापासुन वंचित आहेत.
सन 2011मध्ये ग्रामीण भागात आर्थिक जनगणनेचे सर्वेक्षण करण्यात येवुन गरीब कुटुंबीयांची प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादी मधुन ग्रामीण भागातील अनेक गरीब व गरजु लाभार्थ्यांची नावे वगळली गेली असल्याची बाब उघड झाल्यामुळे नागरिकांच्या तक्रारीचा खच वरीष्ठ पातळीवर पडला होता.
नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत शासनाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीत ज्याची नावे समाविष्ट नाही. अशा गरीब लाभार्थ्यांची निवड स्थानिक ग्रामसभेतुन करण्याची मुभा देण्यात आली होती. सन 2018 मध्ये शासनाच्या धोरणानुसार प्रधानमंत्री आवास योजनेच्या यादीतुन सुटलेल्या लाभार्थ्याना यादी मध्ये समाविष्ट होण्याची संधी ग्रामसभेमुळे मिळाली असली तरी मात्र शासना मार्फत अजुनही घरकुलाचे टार्गेट प्राप्त झालेले नाही.त्यामुळे प्रपत्र “ड” मध्ये समाविष्ठ करण्यात आलेल्या ईतर मागासवर्गीय प्रवर्गाचे लाभार्थ्यी या योजने पासुन वंचित आहेत.
सन 2022पर्यंत सर्वासाठी घरे देण्या बाबतची योजना केंद्र शासनाने घोषीत केली असतांना मात्र 2021पर्यंत ईतर मागासवर्गीयांसाठी एकही घरकुलचे टार्गेटच प्राप्त झाले नसल्याने 2022 पर्यंत शासनाची ही योजना लाभार्थ्यांची स्वप्ने पुर्ण कसे करणार ? असा प्रश्न आता सर्व सामान्य लाभार्थ्यी उपस्थीत करताना दिसत आहे.