वणी येथे श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण व गृह संपर्क अभियानाचे संपर्क कार्यालयाचे उदघाटन
वणी (13 जाने ) :- अयोध्या येथील श्रीराममंदिर निर्माणाकरिता संपूर्ण देशामध्ये दि 15 जानेवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत निधी समर्पण व गृहसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. याकरिता वणी येथे स्थानिक टागोर चौक येथे श्री कामाक्षी देवी मंदिर समोर संपर्क कार्यालयाचे उदघाटन दि 10 जानेवारीला सांयकाळी 7 वा या अभियानाचे तालुका प्रमुख वसंतराव धानोरकर यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी राष्ट्रीय स्वसंयंसेवक संघाचे तालुका संघचालक हरिहर भागवत, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, अनिल आक्केवार प्रामुख्याने उपस्थित होते.

संपुर्ण देशात सुरू होणाऱ्या या अभियानात समाजातील सर्व घटकांचा समावेश राहील अशी योजना करण्यात आली आहे. याकरिता वणी तालुक्याचे अभियान समितीप्रमुख म्हणून वसंतराव धानोरकर व वणी नगर प्रमुख म्हणून अनिल आक्केवार राहणार आहेत. दीड महिना चालणाऱ्या या अभियानाचे कामकाज सुरळीत होण्यासाठी संपर्क कार्यालय करण्यात आले आहे. वणी तालुक्यातील प्रत्येक कुटुंबाने भगवान श्रीरामाचे मंदिर भव्य होण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन अतिथीनी केले. या प्रसंगी नगरातील बहुसंख्य नागरिक बंधू, भगिनी उपस्थित होते.



