झाडीपट्टी नाट्य कलावंतांना पॅकेज जाहीर करा.
झाडीपट्टी नाट्य कलावंतांना तातडीची मदत करून पॅकेज जाहीर करा
सिंदेवाही तालुका झाडीपट्टी नाट्य कलावंत संघटनेची मुख्यमंत्र्याकडे मागणी
पूर्व विदर्भातील झाडीपट्टी रंगभूमी दीडशे वर्षाची परंपरा लाभलेली वैभवसंपन्न अशी रंगभूमी आहे.अस्सल झाडीच्या मातीतील कलावंतांनी इथल्या रंगभूमीला आपल्या अभिनयाने फुलवून वेगळी ओळख देऊन “झाडीपट्टी रंगभूमी”ची निर्मिती केली.स्वातंत्र्यपुर्व काळापासून पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक,लावणीप्रधान अशा विविध विषयावरील नाटकांचे सादरीकरण करून समाजप्रबोधनाचे महत्त कार्य आजतागायत झाडीपट्टीचे कलावंत करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा मुख्यत्वे खऱ्या अर्थाने कलावंताची खान असणारा तालुका म्हणून ख्यातीप्राप्त असून तालुक्याला “झाद्दीपट्टीचे माहेरघर ” असे संबोधले जाते.झाडीपट्टीच्या नाटकांच्या उत्सवाला दिवाळीच्या सणापासून आरंभ होऊन थेट एप्रिल महिन्यापर्यंत नाटकांची रेलचेल सुरू असते.झाडीपट्टीतील सर्वसामान्य घरातील प्रतिभा अभिनयाच्या रूपाने बाहेर पडून मनोरंजनासासोबतच प्रभावीपणे समाजप्रबोधनाचे कार्य करते आहे. नाटकातुन मिळणाऱ्या मानधनातुनच संसाराचे रहाटगाडगे कसेबसे कलावंत पुढे हाकीत असतात. चार-पाच महिन्यांच्या नाट्यप्रयोगाच्या
मानधनावर आपला वर्षभराचा उदरनिर्वाह हे कलावंत करीत असतात. परंतु कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे आलेल्या संकटकाळात रंगभूमीचा पडदा न उघडण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे मात्र झाडीपट्टी कलावंताची जगण्याची होरपळ होऊन अनेक कलावंतचे जीवन विस्कळीत होतांना दिसत आहेत.
कोरोनाच्या अशा संक्रमणकाळात सरकार दरबारी संघटनात्मक आवाज देण्याच्या उदेश्याने सिंदेवाही तालुक्यातील सर्व झाडीपट्टीतील कलावंतांची नव्याने संघटना निर्माण करून मा. तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.उद्धव ठाकरे यांना विविध मागण्यांचे निवेदन नुकतेच सादर करण्यात आले.सध्या स्थितीचा विचार करता तालुक्यातील सर्व कलावंतांना प्रत्येकी मासिक ५ हजार रुपये देऊन कलावंतांना २० हजार रुपये पॅकेज जाहीर करावा अशी मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे.निवेदनातील सर्व मागण्यांची पूर्तता करून झाडीपट्टी नाट्य प्रयोगाला परवानगी द्यावी व कलावंताची उपासमार आणि होरपळ थाम्बवावी अशी विनंती शासनाला करण्यात आली.
सदर निवेदन सादर करतांना झाडीपट्टीतील जेष्ठ रंगकर्मी आणि संघटनेचे सल्लागार प्रा. डॉ.शेखर डोंगरे,संघटनेचे अध्यक्ष श्री.अनिल उट्टलवार,उपाध्यक्ष
तथा प्रसिद्धी प्रमुख श्री. मंगेश मेश्राम, सचिव श्री. सिद्धार्थ कोवले ,सहसचिव श्री. गणेश खडसे, कोषाध्यक्ष श्री.पंकेश मडावी तसेच संघटनेचे सल्लागार श्री.कैलास शेंडे,सदस्य श्री. सुनील डोंगरे,श्री. लालू पेंदाम,श्री. छबिल पेंदाम ,श्री. शिवा श्रीरामे, श्री.भक्तदास धुर्वे,श्री.पतरु धारणे,श्री.श्रीनिवास आनंदे इत्यादी सदस्य कलावंत उपस्थित होते.



