*सावली तालुक्यात युरिया खताचा साठा उपलब्ध करून द्यावा- प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी*
*सावली तालुक्यात युरिया खताचा साठा उपलब्ध करून द्यावा- प्रहार सेवक राकेश गोलेपल्लीवार यांची मागणी*
सावली तालुका प्रतिनिधी
सावली – तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून दडी मारून शांत बसलेल्या वरून राजाच्या आशीर्वादाने एकाएकी मागील आठवड्यापासून मेघगर्जनेसह मुसळधार वर्षावाला सुरुवात झाली आहे . त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आनंदाने सुखावला असून खरीप पिकाच्या हंगामी लागवडीला जोमाने लागला आहे.
सावली तालुक्यात ठिकठिकाणी पावसाला सुरुवात झाली असून तालुक्यात मोठ्या प्रमाणात असलेला शेतकरी वर्ग खरीप हंगामी शेतीच्या कामाला लागला असून त्यामुळे शेतीची मशागत तसेच परे टाकणीच्या कामाला वेग आले आहे . परंतु शेतीसाठी तसेच पिकांच्या वाढीसाठी पूरक असलेला युरिया खताचा तुटवडा असल्याने बळीराजाला कृषी केंद्रासमोर ताटकळत उभे राहून नकारात्मक सुराने निराश आणि हताश होऊन परतावे लागत आहे. शेतीच्या कामाला जोमाने सुरुवात होऊनही अशा अनुकूल वातावरणात पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या युरिया खताची ऐन हंगामात तुटवडा झाल्याने संबंधित विषय शेतकऱ्यांची चिंता वाढवून डोखेदुखीचा विषय बनला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांचे गांभीर्याने दखल घेत तालुक्यात खताचा तुटवडा भरून काढून युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी मा. राकेश गोलेपल्लीवार प्रहार सेवक, सावली यांनी केली आहे .



