*जेप्रा येथील पाण्याची टाकी सहा महिन्यांपासून बंद; ग्रामस्थांचा संताप*
*पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण; ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह*
जावई टोली, जेप्रा (ता./जि. गडचिरोली) : जावई टोली, जेप्रा येथील सार्वजनिक पाण्याची टाकी गेल्या सहा महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने परिसरातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून दुरुस्ती अथवा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
पाण्याची टाकी बंद असल्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी दूरवर जावे लागत आहे. विशेषतः महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत असून दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली.
ग्रामीण भागात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा करणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
ग्रामपंचायतीने तातडीने पाण्याची टाकी दुरुस्त करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अन्यथा संबंधित विभागाकडे तक्रार करून लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर समस्येवर किती लवकर उपाययोजना करते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.



