*कायदेविषयक जनजागृती शिबिराला’ उत्स्फूर्त प्रतिसाद*
सावली : नागरिकांना त्यांच्या हक्कांची व कर्तव्यांची जाणीव व्हावी, तसेच दैनंदिन जीवनाशी संबंधित कायदे सोप्या व समजेल अशा भाषेत कळावेत, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका विधी सेवा समिती, सावली व पंचायत समिती, सावली यांच्या संयुक्त विद्यमाने मौजा जिबगाव (ता. सावली) येथे ‘कायदेविषयक जनजागृती शिबिर’ उत्साहात पार पडले.

या शिबिराचे उद्घाटन दिवाणी व फौजदारी न्यायालय, सावलीचे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी (प्रथम श्रेणी) मा. श्री ए. एस. शर्मा यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर गट विकास अधिकारी एम. कोमलवार, पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे, विधी स्वयंसेवक षडाकांत कवठे, अधिवक्ता डी. व्ही. आंबटकर व ए. एन. गेडाम, सरपंच पुरुषोत्तम चुधरी उपसरपंच मोनी उंदिरवाडे, ग्रामसेवक के. ए. श्रीरामे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक एस. एम. उरकुडे यांनी केले. “सामान्य नागरिकांना कायद्याची भीती न वाटता त्याचा आधार घेता यावा, यासाठी अशा जनजागृती शिबिरांची नितांत गरज आहे,” असे त्यांनी नमूद केले.
शिबिरातील प्रमुख मार्गदर्शन
मा. श्री ए. एस. शर्मा यांनी पॉक्सो कायदा, गुड टच–बॅड टच, महिलांसंबंधी कायदे तसेच मध्यस्थीचे महत्त्व यावर सविस्तर मार्गदर्शन केले. कायद्याचे मूलभूत ज्ञान प्रत्येक जागरूक नागरिकासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
अधिवक्ता डी. व्ही. आंबटकर व ए. एन. गेडाम यांनी महिलांचे हक्क, पोटगी व वारसा हक्क याविषयी माहिती दिली.
पोलीस उपनिरीक्षक सचिन मुसळे यांनी ऑनलाइन फसवणूक टाळण्याचे उपाय, सायबर कायदे तसेच वाहतूक नियम व दंड यावर सविस्तर चर्चा केली.
गट विकास अधिकारी एम. कोमलवार यांनी महिला व फौजदारी कायदे यांवर मार्गदर्शन केले.
विधी स्वयंसेवक षडाकांत कवठे यांनी बाल संरक्षण, बालविवाह व बालमजुरी प्रतिबंध या विषयांवर माहिती दिली.
या शिबिरात गावातील सुमारे २५० विद्यार्थी, नागरिक, महिला व युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. उपस्थितांना कायदेविषयक माहितीची पुस्तिकाही वाटप करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. एम. उरकुडे (गुरुदेव हायस्कूल, जिबगाव) यांनी केले, तर आभारप्रदर्शन मुकेश वांढरे, कनिष्ठ लिपिक, दिवाणी व फौजदारी न्यायालय, सावली यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी न्यायालयीन कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच शिक्षकवृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.



