जिल्हा बँकेचे संचालक रोहित बोम्मावार भाजपच्या वाटेवर?
सावली: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर होताच चंद्रपूरच्या राजकीय पटावर नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. विशेषतः सावली तालुक्यात युवकांमध्ये लोकप्रिय असलेले युवा नेतृत्व, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व साथ फाऊंडेशनचे संस्थापक रोहित बोम्मावार लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
विश्वसनीय सूत्रांनुसार, बोम्मावार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्कात असून, येत्या काही दिवसांत मुंबईत भाजपच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा औपचारिक पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. त्यांच्या प्रवेशामुळे सावली तालुक्यात भाजपला युवकांमध्ये मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून बोम्मावार यांनी सहकार, शिक्षण आणि समाजसेवा या क्षेत्रात ठसा उमटवला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा न घेता त्यांनी “साथ फाऊंडेशन”च्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम सातत्याने राबवले. त्यामुळे त्यांच्या कार्याची विश्वासार्ह, सकारात्मक आणि समर्पित कार्यकर्त्याची प्रतिमा समाजात निर्माण झाली आहे.
सीडीसीसी बँकेत निवडून आल्यानंतर बोम्मावार यांची आमदार बंटी भांगडीया यांच्याशी जवळीक वाढली. त्यांच्या विविध कार्यक्रमांमध्ये बोम्मावार यांची उपस्थिती तसेच सावली येथे आयोजित सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवात भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीने या चर्चेला अधिक चालना मिळाली.
गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरूच होती. आता जिल्हा परिषदेसाठी आरक्षण जाहीर होताच बोथली–कवठी क्षेत्रात अनुकूल आरक्षण मिळाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, “रोहित भाऊ आमचा नेता, लई पावरफुल!” या घोषणांनी सोशल मीडियापासून गल्ली–बोळापर्यंत उत्साह उसळला आहे.
| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 |
| 8 | 9 | 10 | 11 | 12 | 13 | 14 |
| 15 | 16 | 17 | 18 | 19 | 20 | 21 |
| 22 | 23 | 24 | 25 | 26 | 27 | 28 |
| 29 | 30 | 31 | ||||