होमगार्ड सैनीकांशी अरेरावी करणे पडले महागात..
अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिले गुन्हा दाखल करण्याचे आदेश,
विदर्भ 24 न्यूज़ जिल्हाप्रतिनिधी
जालना: – कोरोना माहामारीने राज्यभरात थैमान घातलेले असताना पोलीस प्रशासनासह आरोग्य विभाग व प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड सैनिक जीव धोक्यात घालुन कर्तव्य बजावत आहेत . परंतु काही महाभाग पोलीस तसेच आरोग्य विभागाशी हुज्जत घालुन प्रशासनाने दिलेल्या नियमांना फाटा देत शहरासह जिल्हाभरात सर्रास फिरत आहेत. जालना शहरातील नुतन वसाहत भागात अशा प्रकारे तोंडावर मास्क न लावता दुचाकीवर फिरणाऱ्या एका तरुणाने होमगार्डशी केलेली अरेरावी त्याच्या आंगलट आली आहे . याबाबत सविस्तर वृत्त असे की, जालना शहरातील नुतन वसाहत परिसरात गुरुवारी दि.१८ होमगार्ड सैनिक प्रकाश दिलीप शिंदे, रविंद्र बाबुराव शिंदे,अनिल भीमराव मस्के व नगर पालिकेचे कर्मचारी श्रावण विठ्ठल सराटे , जि.प.शिक्षक अमोल विनायकराव भागवत, पंकज बाबुराव गोरे, यांचे पथक रस्त्यावर विना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई करीत होते. यावेळी एका दुचाकीवर आलेल्या ( एमएच २१ बीबी २६९२ ) एकास मास्क न लावल्याने होमगार्ड रविंद्र बाबुराव शिंदे यांनी इशारा करुन थांबवण्याचा प्रयत्न केला असता दुचाकी चालक महेंद्र दिनकर गव्हाणे रा. महाकाळा ता.अंबड याने होमगार्ड शिंदे यांच्या अंगावर दुचाकी घातली. तेथील कर्मचाऱ्यांनी दुचाकी थांबल्यानंतर चावी काढली असता त्याने तुम्ही होमगार्ड आहात ? तुम्हाला गाडीला हात लावण्याचा अधिकार नाही असे म्हणते बाजुला उभे असेलेले शिक्षक यांच्या हातातील दंडाचे पावती पुस्तक हिसकावून घेतले . होमगार्ड व कर्मचाऱ्यांशी महेंद्र गव्हाणे अरेरावी करीत असतानाच अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार हे पथकासह गस्तीवर आले होते . त्यांनी हा प्रकार पाहील्यानंतर तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपीस ताब्यात घेण्याच्या सुचना कदिम पोलिसांना दिल्या . याप्रकरणी होमगार्ड रविंद्र बाबुराव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी महेंद्र दिनकरराव गव्हाणे याच्याविरुद्ध कदिम जालना पोलीस ठाण्यात भांदवि कलम ३५३,५०४,५०६, १८८,२६९,२७० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस कदिम जालना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.



