१२ जुन पासुन शेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलन — ऍड. वामनराव चटप
*आशिष यमनुरवार/ विदर्भ 24 न्युज*
*शहर प्रतिनिधी, राजुरा.*
संपर्क – 88559 94001
* १२ जुन पासुन शेतकरी संघटनेचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य आंदोलन
* प्रतिबंधीत बियाण्याची लागवड करुन शेतकरी करणार कायदेभंग
* सरकारने तातडीने जनुक सुधारित बियाण्यांवरील बंदी उठवावी – ऍड वामनराव चटप
शेतकर्यांना बियाण्यासहीत सर्व प्रकारचे उपलब्ध तंत्रज्ञान वापरण्याची मुभा असावी, या मागणीसाठी यावर्षी पुन्हा, शेतकरी संघटना प्रतिबंधीत बियाणे पेरुन सविनय कायदेभंग करणार आहे. चालू खरिप हंगाम हा तंत्रज्ञान स्वातंत्र्य हंगाम म्हणून साजरा करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट व माजी आमदार ऍड वामनराव चटप यांनी दिली आहे.
शेतकर्यांना त्यांच्या आवडीनुसार कोणतेही बियाणे किंवा तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य असावे, यासाठी शेतकरी संघटना अनेक दशकां पासुन प्रयत्नशील आहे. शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार शरद जोशी यांनी याविषयी सविस्तर भूमिका मांडली होती. गेल्या दोन वर्षापासून लढा तिव्र करत एचटीबीटी कपाशीची जाहीर लागवड केली होती तसेच संबंधीत मंत्र्यांना इमेल करुन जनुक सुधारीत बियाण्यांवरील बंदी उठविण्याची मागणी केली होती. केंद्र शासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी संघटनेने चालू गळीत हंगामात जनुक सुधारीत ( जेनिटिकली मॉडीफाईड) कापुस, मका, भात,मोहरी, सोयबीन, वांगी इत्यादी पिकांची जाहीर लागवड करणार आहे. प्रतिबंधीत बियाण्याची लागवड केली म्हणुन शेतकर्यांवर गुन्हे दाखल केल्यास शेतकरी तुरुंगात जायला तयार आहेत.
केंद्र सरकारने शेतीत काही प्रमाणात खुलीकरण करणे सुरु केलेआहे, त्याचे स्वागतच आहे. परंतु जिएम तंत्रज्ञाना बाबत तातडीने निर्णय घेणे अपेक्षीत आहे. शासनाने बंदी उठविल्या नंतर बियाण्याच्या चाचण्या घेउन मान्यता मिळण्यास किमान तिन वर्षाचा कालावधी लागतो. सध्या तर कोणत्याही बियाणे उत्पादक कंपनीचा परवानगीसाठी अर्ज नाही. शासनाने बंदी उठविल्याचे जाहीर केल्या शिवाय सरकारकडे अर्ज प्राप्त होणार नाहीत.
जगात अनेक जिएम पिके घेतली जातात. कमी खर्चात जास्त उत्पादन काढल्यामुळे ते जगाच्या बाजारपेठेत कमी दराने शेतीमाल विकू शकतात. भारताला जर या देशांशी स्पर्धा करायची असेल तर भारतातल्या शेतकर्याना जिएम पिके घेण्याची परवानगी असली पाहिजे, यावर शेतकरी संघटना ठाम आहे. म्हणून १२ जून रोजी महाराष्ट्रासहीत पंजाब, हरियाणा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश व गुजरात या राज्यांमध्ये तंत्रज्ञान हंगाम साजरा केला जाणार आहे. शेतकरी जाहीरपणे प्रतिबंधीत बियाण्यांची लागवड करणार आहेत. तंत्रज्ञनाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी शेतकर्यांनी चोरुन प्रतिबंधीत बियाणे न लावता जाहीरपणे लागवड करावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट, जेष्ठ नेते माजी आमदार ऍड.वामनराव चटप यांनी केले आहे.
**********
सरकारने तणनाशक रोधक कपाशीच्या (एचटीबिटी) बियाण्यावर बंदी घातलेली असली तरी राज्यात लाखो हेक्टरवर प्रतिबंदीत बियाणे वापरले जाते. या बियाण्याचा सर्व व्यापार काळ्या बाजारात होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात अशुद्ध, बोगस व कमी दर्जाचे बियाणे शेतकर्यांना विकले जाण्याची शक्यता असते. शेतकर्याची फसवणुक झाली असली तरी त्याला कोणा विरुद्ध कुठेही दाद मागता येत नाही. केंद्र शासनाच्या पर्यावरण मंत्रालयाने जर या बियाण्याना अधिकृत परवानगी दिली तर शेतकर्यांची फसवणुक होणार नाही. यापूर्वी केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी अनुकूल भूमिका घेतली आहे. परंतु सरकार अद्याप याविषयी स्पष्ट भूमिका घेत नाही, हे दुर्दैव आहे.



