जनादेश वृत्तवाहिनी या स्थानिक वृत्तवाहिनीचा बारावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला…

जनादेश वृत्तवाहिनी या स्थानिक वृत्तवाहिनीचा बारावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला…
मुंबई :- जनादेश वृत्तवाहिनी या स्थानिक वृत्तवाहिनीचा बारावा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक 30 जानेवारी 2021 रोजी कुर्ला नेहरूनगर येथील माननीय बाळासाहेब ठाकरे समाज केंद्र येथे मोठ्या दिमाखात पार पडला. अशा या वर्धापन दिन कार्यक्रमाचे अध्यक्षपद लोकशाही चॅनलच्या अँकर आणि सीनियर प्रोडूसर माननीय मनुश्री पाटील यांनी भूषविले तर तू पाहुणे म्हणून कुर्ला विधानसभा आमदार मंगेश कुडाळकर उपस्थित होते. त्याचबरोबर सन्माननीय पाहुणे म्हणून शिव केबल सेनेचे सरचिटणीस विनय (राजू) पाटील , अँटी करप्शन कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष रबिंद्र द्विवेदी, उद्योजक अब्दुलरहीम खान यांच्यासह वृत्तवाहिनीचे संपादक सुरेश पाटील उपस्थित होते .यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संपादक सुरेश पाटील यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सन्मान शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. जनादेश वृत्तवाहिनी च्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा सामाजिक विशेष पुरस्कार नवी मुंबई नेरूळ येथील विद्यावर्धिनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य बाळाराम पाटील यांना ते शैक्षणिक क्षेत्रात करीत असलेल्या अमुल्य सामाजिक कार्याबद्दल प्रदान करण्यात आला तर क्रीडा पुरस्कार तायकांडो खेळाकरिता मोलाचे कार्य करणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक आणि पंच श्री जयेश वेल्हाळ यांना प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे या वर्धापन दिन कार्यक्रमास उपस्थित सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांचा तसेच पत्रकारांचा सत्कारही यावेळी करण्यात आला . या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे आमदार मंगेश कुडाळकर यांनी मागील बारा वर्षापासून जनादेश वृत्तवाहिनी जनतेमध्ये जाऊन करीत असलेल्या कार्याचे कौतुक करीत जनादेश वृत्तवाहिनीच्या कार्यास शुभेच्छा दिल्या तर कार्यक्रम अध्यक्षा लोकशाही चॅनलच्या अँकर मनुश्री पाटील यांनी सॅटॅलाइट चैनल च्या दुनियेत मागील बारा वर्षापासून आपले स्थान अबाधित राखीत जनादेश वृत्तवाहिनी लोकांपर्यंत स्थानिक बातम्या पोहोचवण्याचे करीत असलेले कार्य नक्कीच कौतुकास्पद असल्याचे म्हणत येत्या काळात जनादेश वृत्तवाहिनी आपला 25 वा वर्धापन दिन नक्की साजरा करेल असे गौरउद्गार काढले. या कार्यक्रमा प्रसंगी संपादक सुरेश पाटील यांनी जनादेशाची संपूर्ण टीम आणि उपस्थित मान्यवर तसेच जनादेश वर प्रेम करणाऱ्या हितचिंतकांच्या सहकार्यामुळेच आम्ही 12 वा वर्धापन दिन साजरा करू शकलो असे म्हणाले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश मिरगुडे आणि सचिन मोरे यांनी केले.