राज्यातील 5 वी ते 8 वीच्या शाळा सुरु होणार…राज्य सरकारचा हिरवा कंदील.
यवतमाळ /वणी :- राज्यभरातील शाळा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दहा महिन्यांपासून बंद आहेत. शाळा कधी सुरु होणार याबाबत पालक आणि विद्यार्थीवर्गात कमालीची उत्सुकता होती. अखेर राज्यात शाळा उघडण्याबाबत आज सकारात्मक निर्णय झाला आहे. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, शाळा प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत 27 जानेवारीपासून सुरू होतील अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिक्षण विभागाच्या बैठकीत दिली. शाळा सुरू करताना विद्यार्थी व शिक्षक यांची पुरेशी कोरोनाविषयक काळजी घ्यावी,अशी सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी त्यांना केली.
करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरु करण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे.अंतिम निर्णय मात्र स्थानिक प्रशासनावरच सोडण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शाळांमध्ये इ.5 वी ते 8 वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या 27 जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी खात्री पालकांना देते, असा विश्वास त्यांनी पालकांना दिला आहे.
दरम्यान, स्थानिक परिस्थितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने याबाबतचा निर्णय घ्यावयाचा आहे. अर्थात यासाठी पालकांची संमती, शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी आदी सर्व यापूर्वीचे नियम यापुढेही लागू राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भातील माहिती दिली .



