फसवणूक झालेल्या पीक विमाधारक शेतकऱ्यांच्या ‘जवाब दो’ आंदोलनात सहभागी व्हा – सुनील कातकडे यांचे आव्हान
खा. भावनाताई गवळी यांचे नेतृत्वात पीक विमा कंपन्या विरोधात जवाब दो आंदोलन
वणी (27 .डिसें):- पिक विमा कम्पनीच्या विरोधात यवतमाळ येथे सोमवारी दि.२८ डिसें. ला शेतकऱ्यांचे “‘जवाब दो”’ आंदोलन शिवसेनेच्या खा. भावनाताई गवळी यांच्या नेतृत्वात होणार आहेत. या आंदोलनात वणी विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आव्हान शिवसेनेचे वणी विधानसभा प्रमुख सुनील कातकडे यांनी केले आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यावर अस्मानी व सुलतानी संकट असतांनाच आता पिक विमा कम्पनीने शेतकऱ्यांना पिक विमा नाकारला आहे. जिल्ह्यातील ४ लक्ष ६७ हजार शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. याद्वारे जिल्ह्यातील इफको टोकियो जनरल इन्शुरन्स कम्पनित १६७ कोटी रुपये पिक विमा जमा झाला. मात्र नियमांच्या निकषावर बोट ठेऊन सोयाबीन, कापूस तसेच अन्य पिकांचा विमा कंपनीने शेतकऱ्यांना न दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कम्पनीच्या फसव्या निकषानुसार विम्यास पात्र जिल्ह्यंयील फक्त ९७७६ शेतकऱ्यांना ९ कोटी ३८ लक्ष रुपयाचे वाटप केले. मात्र ४लक्ष ५७ हजार २४५ शेतकऱ्यांनी हप्त्यापोटी भरलेले १५८ कोटी निकषावर बोट ठेऊन हडपण्याचा प्रयत्न विमा कम्पनी करीत आहे. नापिकीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना विम्याचा आधार असतांना विमा कम्पनी आपल्या नफेखोरी धोरणामुळे शेतकऱ्यांसह राज्य तसेच केंद्र सरकारला सुद्धा लुबाडण्याचा प्रयत्न करीत आहे.
म्हणून ह्या नफेखोर कम्पनीला जिल्ह्यातील विमा करारातून हद्दपार करण्यासाठी व शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी यवतमाळ येथे दि.२८ डिसेम्बरला टिम्बर भवन, स्टेट बँक चौक येथे आयोजित केलेल्या भव्य शेतकरी ‘जवाब दो’ आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन शिवसेनेचे वणी विधानसभा क्षेत्राचे प्रमुख सुनील कातकडे यांनी केले आहे.



