बीआरएसपी तर्फे राज्यभर जनसंघर्ष यात्रा..
-३जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी होणार प्रारंभ,
विदर्भ 24न्यूज
जिल्हा प्रतिनिधी/ गडचिरोली : बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ( बीआरएसपी ) तर्फे ३ जानेवारी ते ७ मार्च या कालावधीत राज्यभर जनसंघर्ष यात्रा काढली जाणार आहे , अशी माहिती पार्टीचे विदर्भ प्रदेश महासचिव भास्कर बांबोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे . राज्यात पायाभूत सोयीसुविधांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा , शेतमाल मूल्यांच्या रक्षणासाठी किसान कोर्ट किंवा शेतकरी लवादाची निर्मिती करावी. कंत्राटी पद्धतीने नोकरभरती नकरता स्थायी पदावर नेमणूक करावी , विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांचे आधुनिकीकरण करावे तसेच प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर वसतीगृहांची निर्मिती करावी. ओबीसींची जनगणना करावी, त्यासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करून निधीचे वितरण करावे.
गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांना वनपट्टे द्यावे,
रेतीचे लिलाव करावे आदी मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ३ जानेवारीपासून आलापल्ली येथून संघर्ष यात्रा काढली जाईल . त्याच दिवशी यात्रा गडचिरोली येथे पोहोचेल. सायंकाळी गडचिरोलीत सभा होईल. प्रत्येक जिल्ह्यातून संघर्ष यात्रा जाईल. यावेळी सभा सुद्धा घेतल्या जातील.
७ मार्च रोजी मुंबई येथे जनसंघर्ष यात्रेचा समारोप होईल , अशी माहिती भास्कर बांबोळे यांनी दिली. यावेळी पार्टीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड , जिल्हा प्रभारी सदाशिव निमगडे , पुरूषोत्तम रामटेके , मिलींद बांबोळे , तालुकाध्यक्ष दीपक बोलीवार , प्रतिक डांगे, प्रितेश अंबादे , संघरक्षित बांबोळे, जितेंद्र बांबोळे, महेश टिपले,मून रायपुरे, विजय देवतळे हजर होते.



