सरकार मागणार आता कढईतल्या तेलाचा हिशेब !
सरकार मागणार आता कढईतल्या तेलाचा हिशेब !
▪तळण्यातून उरलेले तेल जमा करणार▪त्याचे ऑडीटही होणार ▪तेलाच्या पुर्नवापरावर बंदी▪केंद्राची ‘रूको’ मोहिम▪उरलेल्या खाद्यतेलापासून जैवइंधन▪महाराष्ट्रासाठी एजन्सी नियुक्त
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
हॉटेल, रेस्टॉरंट, मेस, कँटीन आणि केटरर्स दररोज तळण्यासाठी ५० लिटरपेक्षा अधिक खाद्यतेल वापरत असतील, तर यापुढे त्यांना सरकारला याची माहिती द्यावी लागेल. कढईत नेमके किती तेल वापरले, किती उरले याचा हिशेब ठेवावा लागेल. तळण्यासाठी तेलाचा पुर्नवापर आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे सरकारने उरलेल्या तेलापासून जैवइंधन तयार करण्याचे ठरवले आहे. तेल गोळा करण्यासाठी महाराष्ट्रासाठी एजन्सीही नेमण्यात आली असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.
भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण म्हणजेच ‘एफएसएसएआय’ने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ च्या कलम १६ (१५) अन्वये तेलाच्या पुर्नवापरावर बंदी आणली आहे. काही माेठे व्यावसायिक एकाच तेलाचा वारंवार वापर करतात, उरलेले तेल छोट्या व्यावसायिकांना स्वस्तात विकतात, ते परत याचा तळण्यासाठी वापर करत असल्याच्या तक्रारी ‘एफएसएसएआय’कडे येत होत्या. त्यावर हा निर्णय घेण्यात आला. यासाठी ‘रिर्पपस यूज्ड कुकिंग ऑईल’ म्हणजेच ‘रूको’ मोहिम सुरू करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) मिलींद शाह यांनी दिली. राज्याने तेल जमा करण्यासाठी राजस्थानच्या सिरोही येथील ब्ल्यु स्टोन एनर्जी प्रा.लि. कंपनी नेमली आहे. या कंपनीने औरंगाबाद विभागात मे. कॉस्मी ग्रूप ऑफ इंडस्ट्रीजची नेमणूक केली आहे.
“मोठ्या व्यावसायिकांना बंधनकारक”
▪हॉटेल, मेस, फरसान, स्वीट मार्ट, चीप्स वेफर्स तयार करणारे व्यावसायिक आदी खाद्य तेलाचा दररोज ५० लिटरपेक्षा वापर करणाऱ्या व्यावसायिकांना हा नियम लागू आहे. त्यांच्याकडे उपलब्ध तेलाचा प्रकार, तळण्यासाठी वापरलेले तेल, दिवसा अखेरीस उरलेले तेल आणि ते एजन्सीला दिल्याच्या तारखेचा रेकाॅर्ड ठेवावा लागेल. उरलेले तेल साठवावे लागेल. एक टन जमा झाल्यावर एफएसएसएआय किंवा राज्याच्या अन्न सुरक्षा आयुक्तांनी नियुक्त केलेली एजन्सी निश्चित रक्कम देवून तेल घेऊन जातील, असे, अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त उदय वंजारी शाह यांनी सांगीतले.
“जैवइंधनासाठी वापर”
▪भारतात वर्षाकाठी ९८६.६७ व्यावसायिक तर १४८० कोटी लिटर घरगूती अशा २४६६.६७ कोटी लिटर खाद्यतेलाचा वापर होतो. यापैकी २० % म्हणजे १४८ कोटी लिटर व्यावसायिक तर ७४ कोटी लिटर घरगूती अशा २२२ काेटी लिटर तेलाचा पुर्नवापर केला जातो. सद्या यापैकी १३३.२० कोटी लिटर (६० %) तेलाचा परत तळण्यासाठीच वापर होतो. साबणीसाठी ३३.३० कोटी लिटर (१५ %), पशूखाद्य ३३.३० कोटी लिटर (१५ %) तर बायोडिझेलसाठी २२.२० कोटी लिटर (१० %) तेल वापरण्यात येते. उरलेले तेल फेकून दिल्याने पर्यावरणाची हानी होते. यामुळे राष्ट्रीय जैवइंधन धोरण २०१८ मध्ये खाद्यतेलाचा जैवइंधन म्हणून वापर करण्याचे सूचवले आहे.
“हे लक्षात ठेवा”
▪घरातही तेलाचा पुर्नवापर टाळा, फारतर ३ वेळेस पदार्थ तळा, उरलेले तेल गाळून घ्या, यातील अन्न पदार्थ वेगळे होतील. तळलेले तेल २ दिवसात वापरा, फोडणीतून निळा-धूळकट रंग आला, काळे किंवा घट्ट झाले तर तेल लगेच बदला.




