पोलिस हवालदार ३ हजार रुपयांची लाच घेताना अडकला एसीबीच्या जाळ्यात,
गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई,
विदर्भ 24 न्यूज
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली:- येथील पोलिस स्टेशनचा पोलिस हवालदार श्याम सुकाजी मानकर ( ५० ) यास ३ हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज,३ जुलै रोजी रंगेहात पकडून अटक केली आहे. यातील तक्रारदार हे निफंद्रा ता. सावली , जि. चंद्रपूर येथील रहिवासी असून ते शेती करतात . तक्रारदाराने पोलिस स्टेशन गडचिरोली येथे शेतीच्या कब्जाबाबत तक्रार केली . या तक्रारीचा निपटारा करण्याच्या कामासाठी पोलिस हवालदार श्याम मानकर याने ३ हजार ५०० रुपये लाच रक्कमेची मागणी केली . मात्र तक्रारदाराची लाच रक्कम देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे तक्रार दाखल केली . या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक यशवंत किसन राऊत यांनी गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा रचला . दरम्यान , पोलिस हवालदार श्याम मानकर याने तक्रारदारास शेतीच्या कब्जाबाबत दिलेल्या तक्रारीचा निपटारा करण्याच्या कामासाठी ३५०० रुपये लाच रक्कमेची मागणी करून तडजोडीअंती ३ हजार रुपये गोगाव फाटा येथे स्वीकारुन पळून जाण्याचा प्रयत्न करताना खरपुंडी मार्गावरील सचिन पोल्ट्री फॉर्मजवळ श्याम मानकर याची मोटारसायकल स्लीप झाल्याने ते पडले. त्याचवेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमुने त्यास रंगेहात पकडून उपचारार्थ त्यास गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. या प्रकरणी पोलिस हवालदार श्याम मानकर याच्याविरुद्ध पोलिस स्टेशन गडचिरोली येथे गुन्हा दाखल केला. या कारवाईने पोलिस विभागात खळबळ उडाली असून लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक श्रीमती रश्मी नांदेडकर व अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड , पोलिस निरीक्षक यशवंत राउत , पोलिस निरीक्षक रवी राजुलवाार , सहायक फौजदार मोरेश्वर लाकडे , पोलिस हवालदार प्रमोद ढोरे , नाईक पोलिस शिपाई सतीश कत्तीवार , नाईक पोलिस शिपाई सुधाकर दंडिकेवार , नाईक पोलिस शिपाई देवेंद्र लोनबले , पोलिस शिपाई महेश कुकूडकार , पोलिस शिपाई किशोर ठाकूर , पोलिस शिपाई गणेश वासेकर , चालक पोलिस नाईक तुळशीराम नवघरे , चालक पोलिस शिपाई घनश्याम वडेट्टीवार यांनी केली आहे.



