मुल नगर परिषदेच्या फायर क्वॉर्टरचे उदघाटन
http://vidarbh24news.com/
मुल शहरात 9.50 कोटी रू. निधी अंतर्गत रस्ते व नाली सुधारणेची कामे लवकरच सुरू होणार – आ. सुधीर मुनगंटीवार
मुल नगर परिषदेच्या फायर क्वॉर्टरचे आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन
गेल्या 5 वर्षात विविध विकासकामांच्या माध्यमातुन मुल शहराचा चेहरामोहरा बदलविण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केला असून शहरात रस्ते विकास, सांस्कृतीक विकास, पाणी पुरवठा, पायाभूत सुविधा यावर आम्ही भर दिला आहे. नुकताच मुल शहरातील विविध विकासकामांसाठी 9 कोटी 50 लक्ष रू. निधी मंजूर झाला असून या निधीच्या माध्यमातुन विविध विकासकामांना मंजूरी मिळाली आहे, या विकासकामांना लवकरच सुरूवात होणार आहे. चंद्रपूर जिल्हयातील सर्वात सुसज्ज अशी बाजारपेठ मुल शहरात निर्माण होत आहे. गेल्या 5 वर्षात मुल शहरात झालेल्या अभूतपूर्व विकासकामांच्या झंझावातामुळे सन 2018, 2019 अशी सलग दोन वर्षे ही नगरपालिका स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धे अंतर्गत पारितोषीकाची मानकरी ठरली असून राज्य शासनाचा 10 कोटी रूपयांचा पुरस्कार मुल नगर परिषदेला मिळाला आहे. विकासाचा हा झंझावात मुल शहरातील नागरिकांनी पूर्वी कधीही अनुभवला नाही. या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण सदैव कटिबध्द असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक 25 जून रोजी मुल शहरात कर्मवीर मा.सा. कन्नमवार सभागृह परिसरातील नगर परिषदेच्या फायर क्वार्टरच्या उदघाटन समारंभात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मुल नगर परिषदेच्या अध्यक्षा प्रा. रत्नमाला भोयर, उपाध्यक्ष नंदू रणदिवे, नगरसेवक महेंद्र करकाडे, अजय गोगुलवार, प्रभाकर भोयर, चंद्रकांत आष्टनकर, प्रशांत समर्थ, मुख्याधिकारी श्री सरनाईक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता श्री. वसुले आदींची प्रामुख्याने उपस्थीती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, 9 कोटी 50 लक्ष रू. किंमतीच्या निधी अंतर्गत विविध विकासकामांना मंजूरी मिळाली असून लवकरच या कामांना सुरूवात होणार आहे. या निधीअंतर्गत प्रभाग क्र. 1 ते 6 या सहा प्रभागामध्ये रस्त्यांच्या तसेच नाल्यांच्या सुधारणेची कामे हाती घेण्यात येणार आहे ही विकासकामे घेण्यात येणार आहे. या विकासकामांच्या माध्यमातुन मुल शहराच्या वैभवात अधिक भर घातली जाणार आहे. या आधीही मुल शहरात सिमेंट रस्त्यांचे बांधकाम, अंतर्गत रस्ते व नाल्यांचे बांधकाम, कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांचे स्मारक व सभागृहाचे बांधकाम, पं. दिनदयाल उपाध्याय इको पार्क चे बांधकाम, आदिवासी मुलांचे व मुलींचे शासकीय वसतीगृह, माळी समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतीगृहाचे बांधकाम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय इमारतीचे बांधकाम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अतिरिक्त कार्यशाळेचे बांधकाम, क्रिडा संकुलाचे बांधकाम, जलतरण तलावाची निर्मीती, शहरात पंचायत समितीची अत्याधुनिक इमारत, तहसिल कार्यालयाची अत्याधुनिक इमारत, शहरातील बसस्थानकाचे अत्याधुनिकीकरण व नुतनीकरण, शहरात 24×7 पाणी पुरवठा योजना अशी विकासकामांची मोठी मालीका आम्ही तयार केली आहे. यातील काही कामे प्रगतीपथावर असून बहुतांश कामे पूर्णत्वास आली आहे. मुल शहर ही कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांची कर्मभूमी आहे. या परिसराचा लोकप्रतिनिधी या नात्याने या शहराचे सौंदर्य विकासकामांच्या माध्यमातुन अधिक खुलवत हे शहर महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहर म्हणून लौकीकप्राप्त ठरावे हे आपले स्वप्न आहे, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
या उदघाटन समारंभानंतर मुल शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा आ. मुनगंटीवार यांनी घेतला. विकासकामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडतोड खपवून घेणार नाही, असेही यावेळी बोलताना ते म्हणाले. शहरातील पाणी पुरवठा योजनेच्या 70 किमी पाईपलाईनचे काम पूर्ण झाले असून तसेच भूमीगत विद्युतीकरणाअंतर्गत 42 किमी लाईनचे काम पूर्ण झाल्याची माहिती यावेळी अधिका-यांनी दिली.



