माजी आमदार स्व. प्रभाकरराव मामुलकरांच्या पत्नी सुमनताई बसणार उपोषणाला.
आशिष यमनुरवार विदर्भ २४न्युज राजूरा शहर प्रतिनिधि
माजी आमदार स्व. प्रभाकरराव मामुलकरांच्या पत्नी सुमनताई बसणार उपोषणाला
राजुरा तालुक्यातील नामांकित संस्था म्हणून ओळख असलेल्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा हे शिक्षण क्षेत्रात मोठे नाव कमावलेले आहे. संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांनी अत्यंत खडतर प्रवास करीत या संस्थेला वलय प्राप्त करून दिले आहे. या कार्यात त्यांना अनेकांची मदत लाभली आहे. मात्र त्यांच्या निधनानंतर अल्पावधीतच संस्थेत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे. याला कारण म्हणजे संस्थेचे कार्याध्यक्ष व सचिव नियमबाह्य आणि मनमानी पद्धतीने कारभार पाहत आहेत असा आरोप करीत चक्क प्रभाकर मामुलकरांच्या पत्नी श्रीमती सुमनताई मामुलकर यांनी कार्याध्यक्ष व सचिवांच्या मनमानी कारभाराला पायबंद घालण्यासाठी दिनांक २६ जून पासून श्री. शिवाजी महाविद्यालय राजुरा च्या प्रवेशद्वारावर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. अशा आशयाचे पत्र त्यांनी तहसीलदार राजुरा, पोलिस निरीक्षक राजुरा, संस्थेचे कार्याध्यक्ष, सचिव आणि प्राचार्य यांना देऊन सुचित केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.



