ओबीसी विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात २० टक्के जागा उपलब्ध कराव्या यासाठी सरकारकडे अविनाश पाल यांची मागणी.
ओबीसी विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात २० टक्के जागा उपलब्ध कराव्या यासाठी सरकारकडे अविनाश पाल यांची मागणी.
सावली : मागासवर्गीय विभागाने वसतीगृहाची घोषणा केली मात्र, वसतीगृह तयार होण्यास बराच कालावधी लागणार असल्यामुळे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहात २० टक्के जागा उपलब्ध करुन देण्यात याव्या अशी मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल सावली यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे केली आहे.
१६ मे १९८४ च्या शासन निर्णयानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे शासकीय वसतिगृहात आर्थिकदुष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना २० टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. व या २० टक्के जागांमधून बहुतांशी इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा प्रवेश होत होता. दिनांक ३० जुलै २०१४ च्या परिपत्रकानुसार अनुसूचित जाती ८० टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती १० टक्के आणि इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग १० टक्के वसतिगृहात आरक्षण होते. तथापि इतर मागासवर्गीयांचे कल्याण मंत्रालय स्वतंत्र स्थापन झाल्यानंतर, २१ डिसेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार समाजकल्याण विभागाच्या सर्व वसतीगृहामध्ये ८० टक्के अनुसूचित जाती चे विद्यार्थी, ३ टक्के अनुसूचित जमातीचे विद्यार्थी, ५ टक्के विमुक्त जाती व भटक्या जमातीचे विद्यार्थी, ५ टक्के आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील व इतर मागास प्रवर्ग विद्यार्थी, २ टक्के विशेष मागास प्रवर्गाचे विद्यार्थी, ३ टक्के अपंग विद्यार्थी, २ टक्के अनाथ विद्यार्थी, याप्रमाणे वर्गीकरण करण्यात आल्याने इतर मागासवर्गीय विद्यार्थी या वसतिगृहातील प्रवेशापासून वंचित आहेत.
शासनाने दिनांक ३० जानेवारी,२०१९ परिपत्रक काढून इतर मागासवर्गीय कल्याण मंत्रालय स्वतंत्र करून स्वतंत्र वसतीगृहाची घोषणा केली असली तरी, सध्य:स्थितीत नवीन नियुक्त कर्मचारी वर्ग व इमारती उभारणे अथवा भाड्याने घेणे यासाठी बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे मागील तीन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर इतर मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह प्रवेशापासून वंचित राहिलेले आहेत. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना नवीन वसतीगृहाची सुविधा होईपर्यंत समाजकल्याण विभागांतर्गत अस्तित्वात असलेल्या वसतीगृहाची व इमारतींची क्षमता वाढवून वाढीव क्षमतेत २० टक्के इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना राहणे, जेवण व इतर वसतिगृहाची सुविधा पुरविण्याकरिता इतर मागासवर्गीय कल्याण विभागाने निधी पुरविल्यास इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची सोय होऊन वसतीगृहाची प्रवेशाची समस्या दूर होईल. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाच्या शासकीय वसतीगृहात २० टक्के जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपा तालुका अध्यक्ष अविनाश पाल यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.



