प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचा-यांना आरोग्य कवच
बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचा-यांना आ. मुनगंटीवार पुरविणार आरोग्य कवच
*स्वयंचलित सॅनिटायझर मशीन, आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक गोळया आणि मास्क चे होणार वितरण*
*प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी 50 लिटर सॅनिटायझर*
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान गरीब व गरजूंना विविध माध्यमातुन मदत करण्याच्या दृष्टीने सेवाकार्याची मोहीम राबविणारे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या माध्यमातुन आता बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रूग्णालय व उपजिल्हा रूग्णालयात स्वयंचलित सॅनिटायझर मशीन, आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक गोळया आणि मास्कचे वितरण करण्यात येणार आहे.
चंद्रपूर जिल्हयात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने आ. मुनगंटीवार यांनी आपले लक्ष केंद्रीत केले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रूग्णालये व उपजिल्हा रूग्णालयांमधील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांच्यासाठी या साहित्याच्या माध्यमातुन आरोग्य कवच ते पुरविणार आहेत. या आरोग्य संस्थांमध्ये येणा-या नागरिकांसाठी स्वच्छतेच्या दृष्टीने स्वयंचलित सॅनिटायझर मशीन उपलब्ध होणार असून त्यासाठी 50 लिटर सॅनिटायझर सुध्दा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या आरोग्य संस्थांमधील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांच्यासाठी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथीक गोळया उपलब्ध करून त्यांची प्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच प्रतीकार शक्ती वाढविण्यासाठी आयुर्वेदिक काढयाचे वितरण सुध्दा करण्यात येणार आहे. डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांच्या संरक्षणासाठी मास्कचे वितरण करण्यात येणार आहे.बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण व नुतनीकरण करत त्या माध्यमातुन उत्तम आरोग्य सेवा नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा संकल्प आ. मुनगंटीवार यांनी केला आहे. यासाठी निधी मंजूर करण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सदर आरोग्य संस्थांमधील डॉक्टर्स, नर्सेस, कर्मचारी यांना आरोग्य कवच पुरविण्यासाठी आ. मुनगंटीवार व भाजपा पदाधिकारी सज्ज झाले आहे. हे वितरण कार्य येत्या सोमवार पासून सुरू होत आहे.



