*क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त केशरवाही येथे भव्य रॅली व कार्यक्रम*
सावली: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त केशरवाही येथे भव्य रॅली व प्रेरणादायी कार्यक्रम
केशरवाही : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, थोर समाजसुधारक व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त केशरवाही येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने गावातून भव्य रॅली काढून सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर केशरवाही गावातील प्रमुख मार्गावरून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये महिला, युवक, विद्यार्थी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
“शिक्षण हेच खरे सामर्थ्य”, “स्त्री शिक्षणाशिवाय समाजाची प्रगती शक्य नाही”, “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अमर रहें” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.
रॅलीदरम्यान सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षण, सामाजिक समता, अस्पृश्यता निर्मूलन व अंधश्रद्धा विरोधासाठी केलेल्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात आली.
कार्यक्रमात प्रीतिताई गोहणे, सरपंच ग्रामपंचायत हिरापूर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत समाजातील दुर्बल व वंचित घटकांसाठी त्यांनी उचललेली पावले आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी रमाबाई आंबेडकर विद्यालय, सावली येथील प्राचार्य आर. पी. चौधरी यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन केले. सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजात समता, बंधुता व न्याय प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास गावातील सामाजिक कार्यकर्ते, महिला मंडळाच्या सदस्य, युवक मंडळ, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततेत, शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



