*स्व. वामनराव गड्डमवारांचे समाज समर्पित कार्य सदैव प्रेरणादायी- विजय वडेट्टीवार*
*सावलीतील शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी*
शेतकरी कुटुंबात जन्म घेऊनही राज्याच्या राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान मिळवणारे आणि आयुष्यभर शेती व शेतकऱ्यांशी निष्ठेने जोडलेले लोकनेते वामनराव गड्डमवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यात घडवून आणलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार सावली येथे काढण्यात आले.
लोकनेते स्व. वामनराव गड्डमवार यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त सावली येथील विश्वशांती विद्यालय येथे आयोजित शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी व शेतकरी सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, राजकीय नेते, पदाधिकारी, शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना वक्त्यांनी सांगितले की, आजच्या काळात शेतीसमोरील आव्हाने वाढत असून शेतमालाला योग्य हमीभाव न मिळणे, वाढती उत्पादनखर्चाची समस्या, महागलेली खते-बियाणे व रासायनिक औषधे यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमात लवकरच सावली परिसरात दुग्ध व्यवसाय सुरू करून सुमारे पाच हजार शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याचा संकल्प जाहीर करण्यात आला. तसेच सावली तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गोसेखुर्द धरणाचे पाणी पोहोचवून सिंचनक्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती देण्यात आली. स्व. वामनराव गड्डमवार यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
प्रास्ताविकात स्व. वामनराव गड्डमवार यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत, त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याला दिलेली विकासाची नवी दिशा, कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी व शेतकरी हितासाठी केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील विकास व कृषी क्रांतीवर आधारित माहितीपट उपस्थित शेतकरी बांधवांसमोर प्रदर्शित करण्यात आला.
कृषी प्रदर्शनीत विविध नामांकित कंपन्यांनी बियाणे, खते, फळभाजी उत्पादन व कृषीआधारित उत्पादने यांचे माहितीपूर्ण स्टॉल लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी शेती व्यवसायात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास नागपूर विभाग शिक्षक आमदार सुधाकर अडबाले अध्यक्षस्थानी होते. तसेच सुशीलाताई गड्डमवार, विनायक बांगडे, सुभाष गौर, संदीप गड्डमवार, साधना वाढई, नंदाताई अल्लुरवार, उषा भोयर, अनिल स्वामी, राजाबाळ सांगिडवार, रमाताई गड्डमवार, डॉ. सुरेश महाकुलकर, नंदू नागरकर, प्राचार्य डॉ. चंद्रमौली यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.
हा सोहळा शेतकरी केंद्रित विकासाचा संदेश देणारा ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थित शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.



