*स्व. वामनराव पाटील गड्डमवार जयंतीनिमित्त सावलीत दोन दिवसीय भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनी*
सावली : महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच भारत शिक्षण प्रसारक मंडळ, सावलीचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते स्वर्गीय वामनराव पा. गड्डमवार यांच्या जयंतीनिमित्त स्व. वामनरावजी पाटील गड्डमवार स्मृती प्रतिष्ठान, सावलीच्या वतीने दिनांक २२ व २३ डिसेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय भव्य शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनी व प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम विश्वशांती विद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहे.
या शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या शुभहस्ते होणार असून, अध्यक्ष म्हणून आमदार सुधाकर अडबाले उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी, नगराध्यक्ष साधनाताई वाढई यांच्यासह संदीप गड्डमवार, नंदाताई अल्लुरवार, अनिल स्वामी, राजाबाळ संगीडवार, रमाताई गड्डमवार, डॉ. विजय शेंडे तसेच इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मेळाव्याच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांसाठी विविध शेतीविषयक विषयांवर तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. कापूस लागवड तंत्रज्ञान व संगोपन या विषयावर डॉ. श्रीकांत अमरशेट्टीवार (सहयोगी संशोधन संचालक, यवतमाळ), सेंद्रिय शेती विषयावर भास्कर गायकवाड (तालुका कृषी अधिकारी, बल्लारपूर), शेती पूरक व्यवसाय या विषयावर डॉ. सोनाली लोखंडे (कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही), धान पिकाची लागवड व संगोपन या विषयावर दिनेश पानसे (तालुका कृषी विभाग, सावली) तसेच धान शेतीस पूरक उद्योग या विषयावर डॉ. उषा डोंगरवार (वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, भंडारा) मार्गदर्शन करणार आहेत.
मेळाव्याच्या दुसऱ्या दिवशी सावली तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून, प्रमुख अतिथी म्हणून पुलकित सिंग (मुख्य कार्यपालन अधिकारी, चंद्रपूर), शंकर तोटावार (जिल्हा कृषी अधीक्षक, चंद्रपूर), प्रीती हिरवळकर (जिल्हा कृषी अधिकारी, गडचिरोली), विरेंद्र राजपूत (जिल्हा कृषी विकास अधिकारी, चंद्रपूर) तसेच अंकेक्षक सुनील बल्लमवार उपस्थित राहणार आहेत.
या दोन दिवसीय शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनीत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असून, आधुनिक शेती तंत्रज्ञान, मार्गदर्शन व अनुभवांची देवाणघेवाण करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी बहुसंख्य शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन स्व. वामनराव पाटील गड्डमवार स्मृती प्रतिष्ठान, सावलीच्या वतीने करण्यात आले आहे.



