अखेर राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना मिळाला लाभ
*विजय कोरेवार यांच्या पाठपुराव्याला यश*
सावली : कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यानंतर पीडित कुटुंबाला आधार देण्यासाठी अर्थसाहाय्य योजना आहे मात्र मागील २ वर्षांपासून लाभार्थ्यांना अनुदान मिळाले नाही. याबाबत पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांनी सतत पाठपुरावा केल्यामुळे २ वर्षांपासून प्रलंबित अनुदान मिळाले आहे.

राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेंतर्गत कुटुंब दारिद्र्य रेषेखाली मोडत असलेल्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाचा मृत्यू झाल्यास २० हजार रुपयाची मदत दिल्या जाते. प्रमुख नसल्याने कुटुंबावर आर्थिक संकट कोसळते त्यामुळे त्यांना काही प्रमाणात आर्थिक मदत वेळेत मिळावी हा योजनेमागील उद्देश सामाजिक न्याय विभागाचा आहे मात्र सावली तालुक्यात मागील दोन वर्षांपासून आजतागायत १२५ लाभार्थी पात्र असतांना लाभापासून वंचित होते. लाभ न मिळाल्याने कुटुंबातील विधवा महिला, आर्थिक अडचणीत सापडले होते. या बाबीची दखल घेत माजी सभापती विजय कोरेवार यांनी तहसील कार्यालयात महिलांना घेऊन ठिय्या मांडला होता व भीक मांगो आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र तालुका प्रशासनाने शासन स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न निकाली काढत असल्याचे आश्वासन दिले. विजय कोरेवार यांच्या पाठपुराव्यामुळे नुकतेच लाभार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित अनुदान अदा करण्यात आले आहे.



