महसूल दिन 2025 उत्साहात साजरा – महसूल सप्ताहास प्रारंभ
सावली: दिनांक 1 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महसूल दिन साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत महसूल सप्ताह 2025 मोठ्या उत्साहात राबविण्यात येत आहे. यानिमित्ताने तहसिल कार्यालय सावली येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्माननीय प्रांजली चिरडे, तहसीलदार सावली होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार चांदेकर, तसेच सर्व सहाय्यक महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महसूल सहाय्यक, शिपाई व महसूल सेवक उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत शब्दश्रृंगाराने करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नायब तहसीलदार
संदिप चांदेकर यांनी केले. त्यांनी आपल्या भाषणात महसूल दिनाचे महत्त्व विशद केले. दिनांक 1 ऑगस्ट 1866 रोजी महसूल संचालनालय स्थापन होऊन भारतात महसूल विभागाची पायाभूत रचना घडवून आली. महसूल विभाग हा शासन व जनतेतील दुवा म्हणून कार्य करतो. शासनाच्या विविध योजना, डिजिटल सेवा जसे की सातबारा, फेरफार, नागरी सेवा केंद्रे आदींमुळे विभागाचे कार्य अधिक गतिमान झाले आहे.
यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यात खास करून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना, खरीप हंगाम पीक स्पर्धा, आणि रोजगार सेवक यांचे उल्लेखनीय कार्य गौरविण्यात आले.
उत्कृष्ट सेतू केंद्र संचालक, रोजगार सेवक यांचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. नागरिकांना शासकीय कागदपत्रांचे वाटप करण्यात आले.
शासकीय जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची गरज, पांदन व शिवरस्त्यांच्या दोन्ही बाजूंना वृक्षारोपण, छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान राबविणे, डिबिटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरोघरी भेटी, एम- सांड धोरणाची अंमलबजावणी महसूल सप्ताहामध्ये करण्यात येईल.
कार्यक्रमाच्या शेवटी तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी आपले अध्यक्षीय भाषण व मार्गदर्शन दिले. महसूल विभागाच्या सामाजिक बांधिलकीवर त्यांनी भर दिला आणि सर्व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने काम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुनेश्वर धात्रक
मंडळ अधिकारी तर आभार प्रदर्शन किशोर मडावी नायब तहसीलदार यांनी केले.



