*सादागड हेटी बनले जिल्ह्यातील पहिले ‘सौरग्राम’*

*सादागडात तयार होणार 2 हजार 400 युनिट वीज*
सावली : सावली तालुक्यातील टेकाडी गट ग्रामपंचायत अंतर्गत सादागड हेटी येथील सर्व 19 घरांच्या छतांवर प्रति घर एक किलोवॉटचे सौर प्रकल्प बसविण्यात आले. शाळेसाठीही स्वतंत्र सौर प्रकल्प (विना अनुदान) ची व्यवस्था झाली. एकूण 20 किलोवॉट सौर यंत्रणेमुळे महिन्याला सरासरी 2 हजार 400 युनिट वीजनिर्मिती होणार आहे. सादागड हे आदिवासी गाव जिल्ह्यातील पहिले 100 टक्के सौरग्राम ठरले आहे.अवघ्या 20 दिवसांत हा प्रकल्प कार्यान्वित झाला.
चंद्रपूर महावितरण परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांच्या हस्ते सोमवारी (दि.31) या प्रकल्पाचा शुभारंभ झाला. अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे यांच्याकडून सततचा पाठपुरावा व जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या उस्फूर्त प्रतिसादामुळे जिल्हा नियोजन सर्वसाधारण योजनेमधून प्रशासकीय मान्यता व निधीचा प्रश्न सुटला. यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) मीना साळुंखे, महावितरण मूल उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता चंदन चौरसिया अभियंता मनोज रणदिवे, दी महाराष्ट्र अर्बन को-ऑफ क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापक सूरज बोमावार यांचा मोठा हातभार लागला आहे.
100 टक्के सौरग्राम करण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली 3 मार्च 2025 च्या बैठकीत जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्यामार्फत प्रस्ताव पाठवून मंजुरी दिली होती.
उद्घाटनप्रसंगी कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारवेकर, चंदन चौरसिया उपकार्यकारी अभियंता विजयकुमार राठोड, चंद्रपूर मंडळ, मूल उपविभागाचे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
“प्रधानमंत्री सूर्यघर मोफत योजना गावाच्या विकासात योगदान देणारी योजना आहे. या योजनेतून निवासी कुटुंबांना स्वतःची वीजनिर्मिती करता येते. लाभ घेण्यासाठी काही अटी व शर्ती आहेत. अन्य गावांनीही सादागड हेटी येथील प्रकल्पापासून प्रेरणा घ्यावी.”
*हरीश गजबे, मुख्य अभियंता, चंद्रपूर परिमंडळ*