*अंगी लपलेल्या गुणांचा शोध घेवुन व्यक्तीमत्व घडवा – मधुकर वासनिक*
*व्हॉईस ऑफ मीडिया तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*
सावली: आत्मविश्वास ही यशाची पहिली पायरी असून ही पायरी चढायची असेल तर आपल्या अंगी लपलेल्या गुण आणि बाजुंचा शोध घेणे गरजेचे आहे. मनोयोग्य व्यक्तीमत्व घडविण्यासाठी शिक्षण, कौशल्य, जिद्द आणि सकारात्मक दृष्टीकोन महत्वाचे असून डोळयासमोर ध्येय ठेवून मार्गक्रमण केल्यास यशाच्या पाय-या आपोआप दिसतील. असा विश्वास संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनीक यांनी व्यक्त केला.
व्हाॅईस आँफ मीडियाच्या सावली शाखेच्या वतीने आयोजीत तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदन सोहळा आणि करीअर गाईडन्स मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हाॅईस आँफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक होते. यावेळी नगराध्यक्ष लता लाकडे, संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनीक, नायब तहसिलदार अनमोल कांबळे, चंद्रपूर अर्बन बॅंकेचे अध्यक्ष रोहीत बोम्मावार, सहायक अभियंता प्रिती महाडोळे, जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अनिल गुरनूले, तालुकाध्यक्ष प्रविण झोडे आदि उपस्थित होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन आणि दिप प्रज्वलन करून मान्यवरांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी नायब तहसिलदार अनमोल कांबळे, नगराध्यक्ष लता वाळके आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश खाटीक आणि संवर्ग विकास अधिकारी मधुकर वासनिक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमा दरम्यान नवनिर्वाचित खासदार डाॅ. नामदेव किरसान यांनी मोबाईल वरून विद्याथ्र्यांचे अभिनंदन करून मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता दहावी मध्यें तालुक्यात प्रथम आल्याबद्दल खुशी उंदिरवाडे (पाथरी) द्वितीय क्रमांकाची मानकरी प्राची गेडाम (सावली) आणि तृतिय ठरलेली श्रावणी कोहळे (व्याहाड बुजरूक) आणि इयत्ता बारावी मध्यें प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली काजल प्रधाने (सावली) द्वितीय- तनुजा भांडेकर आणि तृतिय आलेली शर्वरी पाल यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सन्मान करण्यांत आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. शेखर प्यारमवार यांनी केले. विजय गायकवाड यांनी कार्यक्रमाचे संचलन तर गिरीश चिमुरकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटक चंद्रकांत गेडाम, सौरव गोहणे,उमेश गोलेपल्लीवार,टिकाराम म्हशाखेत्री,सुजित भसारकर, रूपचंद लाटेलवार,चंद्रकांत प्रधाने आदिंनी परिश्रम घेतले.