*इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना थकीत हप्ता द्या
*संतप्त शिक्षकांची मागणी : थाळीनाद आंदोलन करण्याचा दिला इशारा*
सावली: प्रा.शेखर प्यारमवार
सातव्या वेतन आयोगाच्या फरकाचा चौथा हप्ता अदा करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. पण शिक्षकांना अद्यापही दुसरा हप्ता मिळाला नाही. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना थकीत हप्ता देण्यात यावा. अन्यथा थाळीनाद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
२४ मे रोजी वित्त विभागाचा चौथा हप्त्याचा शासन निर्णय निर्गमित झाला.
त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जून महिन्यात सातव्या वेतनाच्या फरकाचा चौथा हप्ता मिळेल. मात्र राज्यातील जिल्हा परिषद, खाजगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालय प्राध्यापक आदी शिक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना अद्याप दुसरा व तिसरा हप्ता मिळालेला नाही.
ही बाब शिक्षकांवरील अन्याय असल्याचा आरोप सध्या शिक्षकांकडून केला जात आहे
“एकीकडे वित्त विभागाने सातव्या वेतन आयोगाच्या फरकाच्या चौथ्या हप्त्याचा आदेश काढला. मात्र दोन वर्षांपासून काढलेल्या आदेशानुसार राज्यातील जवळपास सर्व जिल्ह्यातील शिक्षकांना अद्याप दुसरा व तिसरा हप्ता देखील मिळालेला नाही. राज्यातील इतर शासकीय कर्मचाऱ्यांना फरक रक्कम वेळेवर मिळते, मग शिक्षकांना का नाही. हिंगोली, लातूर, रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांना तर अजून पहिला हप्ताही मिळालेला नाही. ही गंभीर बाब आहे.”
*- लखन साखरे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना*
“महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेद्वारे मंत्रालयात शिक्षण व वित्त विभागाकडे यापूर्वी दोन वेळा निवेदन देऊन याविषयी पाठपुरावा करण्यात आला. मात्र वित्त विभागाकडून आवश्यक आर्थिक तरतूद मिळत नसल्याने राज्यातील शिक्षकांना दुसरा व तिसरा हप्ता अदा करण्यात आला नसल्याचे कारण पुढे केले जात आहे. यावरून वित्त विभाग आणि शिक्षण विभाग यांच्यात समन्वय नसल्याचे पुन्हा एकदा दिसून येते. समस्या निकाली न निघाल्यास थाळीनाद आंदोलन करण्यात येईल.”
*- विजय मिटपल्लीवार, तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सावली*



