*वाघोली बुटीला वाघाच्या हल्यात एक महिला ठार
*एकाच महिन्यातील एकाच गावातील दुसरी घटना *
*शासन आणि प्रशासनाच्या कार्यावर प्रश्नचिन्ह?*
प्रतिनिधी:प्रा.शेखर प्यारमवार
सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या व्याहाड खुर्द उप वनपरिक्षेत्रात सावली पासून १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोली बुट्टी येथील प्रेमिका मुकरू रोहनकर वय ५५ वर्ष ही महिला आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची घटना घडली.एकच आठवड्यात दुसऱ्यांदा घटना घडल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे.
सावली वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील क्षेत्र असून या परिसरात वाघ व बिबट यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जनमानसात वनविभागाबाबत प्रचंड आक्रोश निर्माण होत आहे.आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ५५ बळी वाघाच्या हल्ल्यात गेलेले आहेत त्यापैकी सावली तालुक्यातील हा २२वा बळी असून चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता एक तृतीयांश पेक्षा जास्त बळी एका सावली तालुक्यात गेलेले आहेत, ही गांभीर्याची बाब आहे मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. मागील आठवड्यात वाघोली बुट्टी येथीलच ममता हरिश्चंद्र बोदलकर हीचा वाघाने बळी घेतलेला होता.ही घटना ताजी असतानाच वाघाने पुन्हा एकदा एका त्याच गावातील महिलेचा बळी घेतला.
वाघाने महिलेला ठार केलेल्या घटनेची वन विभागाला माहिती कळताच वनविभाग व पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला. मौका पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आला.या घटनेने सावली परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण कायम आहे.



