जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पीक कर्ज वाटपास विलंब.
•तत्काळ कर्ज वितरणाची मागणी
•तहसीलदार मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
मारेगाव(18.मे):- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज वाटपास चांगलाच विलंब होत असल्याने तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत सापडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज वितरण करा या प्रमुख मागणीचे निवेदन तालुक्यातील शेतकऱ्यां सह सहकारी संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळा वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.
तालुक्यातील २२ सहकारी संस्थांच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेने गेल्या हंगामात ४८०० शेतकऱ्यांना ४१ कोटी रुपयांचे पीक कर्ज वितरण केले होते. या पैकी ९६ टक्के शेतकऱ्यांनी आर्थिक जुळवाजुळव करून पीक कर्जाचा मार्च पूर्वीच भरणा केला.दर वर्षी बँक एप्रिल महिन्यात पीक कर्ज वितरण करत होती.परंतु या वर्षी पावसाळा तोंडावर आला तरी बहुतांश सोसायटीचे कर्ज वितरण सुरू झाले नाही.सोसायटी निवडणुकामुळे पीक कर्ज वितरणाला उशीर होत असल्याचे आता पर्यंत सांगितले जात होते.
आता त्यातच जिल्हा बँकेने कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्याने पुन्हा कर्ज वितरणाची प्रक्रिया खोळंबली आहे.त्यामुळे खते-बियाणे याचा तुटवडा जाण्याचा व खतांच्या किंमती वाढण्याची शक्यता असल्याने मोठी आर्थिक झळ शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.यामुळे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आता कुठलाच विलंब न करता शेतकऱ्यांना कर्ज वितरण तत्काळ करा.अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी काँग्रेसच्या अरुणाताई खंडाळकर, शकुंतला ताई वैद्य,मारोती गौरकार,अंकुश माफुर,रामदास काकडे, यादवराव पांडे,सुदर्शन टेकाम,नानाजी डाखरे, विनोद आत्राम,प्रफुल विखनकार, मारोती सोमलकर आदी उपस्थित होते.