कडक उन्हाने बाजारपेठेत शुकशुकाट तर रस्ते निर्मनुष्य……
•तापमान 43 ते 45अंशांवर : उन्हाच्या काहीलीने नागरिक हैराण
वणी (15 मे):- यावर्षी उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून यामुळे तापमानही झपाट्याने वाढून तापमान 40 ते 45 डिग्री सेल्सिअस वाढले आहे. परिणामी, शहरातील रस्ते व बाजारपेठेत शुकशुकाट निर्माण होऊन रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसत आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून कमी होत असलेल्या पर्जन्यमानामुळे जमिनीतील पाणी पातळी मोठ्याप्रमाणात खालावली आहे. त्यावर वाढते तापमान यामुळे मागील एक महिन्यांपासून उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. या वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन ठप्प झाले असून सकाळी 9 वाजतापासून उन्हाची तीव्रता वाढून उन्हाचे चटके आणि वातावरणात उकाडा जाणवत आहे. परिणामी दुपारी वाजतापासूनच शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठेवर या उच्च तापमानाचा परिणाम होऊन बाजारपेठेत शुकशुकाट तर रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक नागरिक आपली कामे दुपारपूर्वीच उरकून घेत आहे.
मात्र कुठल्यातरी सावलीचा आश्रय घेऊन किंवा घरामध्ये विश्रांती करताना दिसून येत आहे. परंतु, दुपारी विजेचा लपंडाव असल्यामुळे घरामध्ये ही बसणे कठीण जात आहे. परंतु, थकबाकीच्या नावाखाली काही तालुके वगळता इतर तालुक्यांना मात्र भारनियनम वाढत आहेत.
उन्हातही विजेचा लपंडावाचा फटका सोसावा लागत आहे. त्याचप्रमाणे सध्या ग्रामीण भागामध्ये शेतीच्या मशागतीची कामे चालू असून शेतकरी व मजूर आपली कामे उन्हापूर्वीच सकाळी लवकरच उठून करत असताना दिसत आहेत. तर दुपारच्या वेळी शेतातील झाडाखाली विश्रांती घेऊन पुन्हा 4.30 च्या दरम्यान ऊन कमी झाल्यानंतर आपली कामे करताना दिसून येत आहे.
ग्रीन नेट प्रत्येक घरात………..
“उन्हाची दाहकता वाढायला लागल्यापासूनच शहरासह ग्रामीण भागातही ग्रीन नेटची मागणी वाढली आहे. घरी ग्रीननेटचे आच्छादन नजरेस पडते. त्यामुळे शहरातील बाजार परिसरात आणि घरांवरही हिरवी छाया पसरल्याचा भास होत आहे. उन्हाची दाहकता कमी करण्यासाठी कसलातरी आडोसा असावा लागतो. यासाठी सर्वत्र ग्रीन नेटचा वापर होत आहे. अंगणात ठेवलेल्या शोभेच्या कुंड्यातील झाडांचे उन्हापासून रक्षण करण्यासाठी संपूर्ण अंगणभर ग्रीन नेटचा वापर केला जात आहे. वरच्या मजल्यावर तसेच अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या नागरिकांच्या घरी गॅलरीतून उन्हाचे झोत वाहतात. गॅलरीत कुलर लावूनही हवेच्या उष्ण झोतांनी वातावरण तितकेसे थंड होत नाही. त्यामुळे पूर्ण गॅलरीवरच ग्रीन नेट टाकून ती झाकण्याचे प्रमाणही वाढले आहे.”