स्थिती पाहून निर्बंध कालावधी वाढवणार –आरोग्यमंत्री राजेश टोपे..

स्थिती पाहून निर्बंध कालावधी वाढवणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे..
मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.
केंद्राकडे दोन हजार टन प्राणवायू पुरवठ्याची मागणी.
जालना :- ब्रेक द चेन हा सध्याचा पंधरा दिवसांचा कालावधी वाढवायचा किंवा नाही याचा निर्णय त्यावेळेची करोनाची परिस्थिती पाहून राज्य सरकार घेईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी जालना येथे सांगितले. टोपे म्हणाले की, मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सदस्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. यामुळे अनेकांना आर्थिक अडचणी येणार असल्या तरी जनतेचा जीव वाचविण्यास प्राधान्य देऊन हे निर्बंध घालावे लागले आहेत. करोनाची साठ हजार रुग्णांपर्यंत दररोज पोहोचणारी संख्या कमी व्हावी यासाठी जनतेने निर्बंधाच्या काळात सरकारला सहकार्य करून संक्रमण आणि संसर्ग टाळावा, अशी विनंती केली आहे. सध्याच्या निर्बंधाचे १५ दिवस एकदा संपू द्या. मग त्या वेळी काय परिस्थिती राहील ते पाहून निर्बंधांचा कालावधी वाढवायचा किंवा नाही याचा निर्णय घेण्यात येईल.