एमपीएससी ची पूर्व परीक्षा रद्द करणारे सरकार नाकर्ते -तारेंद्र बोर्डे (भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष)
वणी (12 मार्च ):- मागील दीड वर्षात पाचव्यांदा महाराष्ट्रातील महाआघाडीच्या सरकारने महाराष्ट्र राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द करून आपला नाकर्तेपणा सिद्ध केला आहे. जो पर्यंत ही परीक्षा घेण्याचे सरकार तातडीने जाहीर करीत नाही, तो पर्यंत भारतीय जनता युवा मोर्चा स्वस्थ बसणार नाही. असा इशारा भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी दिला आहे.
आज महाराष्ट्रात अधिकारी पदाच्या अनेक जागा रिक्त आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे होत नाहीत. तर दुसरीकडे हजारो युवक आपल्या रक्ताचं पाणी करून अभ्यास करीत आहेत.
या दीड वर्षात अनेक युवकांनी आपल्या वयोमर्यादा ओलांडल्यामुळे पात्रता असून देखील ते स्पर्धेच्या बाहेर फेकल्या गेले आहेत.याला हे महाआघाडीचे सरकार जबाबदार आहे.
दि. 15 मार्चला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा चार दिवस आधी रद्द करून शासनाने बेरोजगार युवकांची थट्टा केली आहे.
ही थट्टा सरकारने लगेच थांबवून बेरोजगार सक्षम युवकांना संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी केली आहे.



