*शालेय विद्यार्थ्यांना सत्रांत परीक्षेसाठी विनामूल्य सराव सुविधा*

*शालेय विद्यार्थ्यांना सत्रांत परीक्षेसाठी विनामूल्य सराव सुविधा*
*‘टिलीमिली ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट’ अर्थात ‘टॉप टेस्ट’* कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी महाराष्ट्रातील शाळा अद्याप बंद आहेत. परंतु ‘टिलीमिली’ या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित झालेल्या शैक्षणिक मालिकेद्वारे आणि शाळांनी राबविलेल्या ऑनलाइन तसेच ऑफलाईन प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांचे पहिल्या सत्राचे शालेय शिक्षण पूर्ण करण्याचे प्रयत्न झाले व आता शाळांतर्फे सत्रांत-परीक्षा घेऊन त्यांचे मूल्यमापनही दिवाळीपूर्वी पूर्ण करण्यात येईल.
अनेक शाळांतर्फे सत्रांत तोंडी परीक्षांपाठोपाठ बहुपर्यायी-वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या स्वरुपातील सत्रांत लेखी परीक्षाही घरून देण्याची ऑनलाईन सुविधा विद्यार्थ्यांना देण्यात येईल असे दिसते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी घरचा संगणक किंवा स्मार्टफोन वापरणे अपेक्षित असेल. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना संगणक किंवा स्मार्टफोनवरील अशा ऑनलाईन परीक्षा सोडविण्याचा पूर्वानुभव नाही. त्यामुळे ते व त्यांचे पालक परीक्षेतील गुणांविषयी व यशाविषयी साहजिकच चिंतित आहेत. इयत्ता ५ वी ते ९ वी च्या अशा विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एमकेसीएल नॉलेज फाउंडेशनतर्फे ‘टिलीमिली ऑनलाईन प्रॅक्टिस टेस्ट’ अर्थात ‘टॉप टेस्ट’ ही सराव सुविधा tilimili.mkclkf.org या संकेतस्थळावर एमकेसीएलच्या सहकार्याने विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
इच्छुक विद्यार्थी संगणक किंवा स्मार्टफोनद्वारे या संकेतस्थळावर आपली जुजबी माहिती देऊन नोंदणी करू शकतात व त्याद्वारे मिळालेल्या लॉगीन व पासवर्डचा वापर करून कितीही वेळा विविध विषयांच्या ऑनलाईन परीक्षेचा सराव करू शकतात. प्रत्येक विद्यार्थ्याला मिळणारी प्रश्नपत्रिका इतर विद्यार्थ्याना किंवा त्याच विद्यार्थ्याला पूर्वी आलेल्या प्रश्नपत्रिकेपेक्षा भिन्न असेल. त्यामुळे जितक्या जास्त वेळा विद्यार्थी परीक्षा घेतील तितक्या नवनवीन प्रश्नपत्रिका त्यांना सोडविता येतील व त्यात मिळणाऱ्या गुणांनुसार ते अभ्यासात सुधारणा करू शकतील.
‘टॉप टेस्ट’ सुविधा मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या काळात तर सेमी इंग्रजी व इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी २३ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२० या काळात उपलब्ध असेल. प्रत्येक इयत्तेसाठी विषयनिहाय परीक्षा होईल. प्रत्येक विषयाच्या प्रश्नपत्रिकेत पहिल्या सत्रातील अभ्यासक्रमावर आधारित ३० प्रश्न असतील. त्याद्वारे पाठातील आशय व संकल्पनांचे ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, निर्णयक्षमता, इ. उद्दिष्टांवर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात येईल. एका परीक्षेचा कालावधी ३० मिनिटे असेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना दहा-अकरा दिवस दररोज अनेक विषयांच्या अनेक परीक्षांचा सराव करता येईल. विद्यार्थ्यांनी या tilimili.mkclkf.org संकेतस्थळाला भेट देऊन या विनामूल्य सुविधेचा लाभ घ्यावा.