*महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेची पूर्वसंमती प्रक्रिया तात्काळ सुरू करा – किशोर वाकुडकर*
सावली (बाबा मेश्राम) :
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या महाडीबीटी राज्य कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्रसामुग्री खरेदीसाठी अनुदान दिले जाते. मात्र या योजनेत निवड झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या पूर्वसंमती प्रक्रियेवर बंदी आल्याने अनेक शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे पूर्वसंमती प्रक्रिया पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी मागणी सावली तालुका भाजप अध्यक्ष किशोर वाकुडकर यांनी केली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत असल्याचे त्यांनी सांगितले. ऑक्टोबर 2025 मध्ये महाडीबीटीची वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आली. त्या काळात अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड केली होती. मात्र तीन महिन्यांचा कालावधी उलटूनही लाभार्थी शेतकऱ्यांना अद्याप पूर्वसंमती मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही वाकुडकर यांनी नमूद केले.
या संदर्भात किशोर वाकुडकर यांनी माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडेही पूर्वसंमती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याबाबत मागणी केली आहे.



