*सावली पोलिसांनी ३६ तासांत व्हॉल्व्ह चोरी प्रकरणाचा केला उलगडा : ३ जण अटकेत*
सावली:प्रतिनिधी:प्रा.शेखर प्यारमवार
सावली पोलिसांनी अवघ्या ३६ तासांत नळाचे व्हॉल्व्ह चोरीचा गुन्हा उकरून काढत बुधवारी ३ जणांना अटक केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची (MJP) वैनगंगा नदीपासून सावलीपर्यंत पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन टाकण्यात आली आहे. ३एप्रिल रोजी भवराळा, पारडी, कवठी आणि रुद्रापूर या गावांदरम्यानच्या पाइपलाइनवरील ९ व्हॉल्व्ह जोडणी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची तक्रार सावली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.व्हॉल्व चोरीमुळे परिसरात होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होत होता. त्यामुळे ठाणेदार आशिष बोरकर यांनी पोलीस पथक तयार करून ३६ तासांत ३ आरोपींना ताब्यात घेतले. गोकुळ रमेश पोटे, अंकुश प्रभाकर पोटे दोघेही पारडी तालुका सावली येथील रहिवासी असून अजय बंडू गोहणे रा.फोकुर्डी ता.चामोर्शी जि.गडचिरोली अशी आरोपींची नावे आहेत. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरलेले व्हॉल्व्ह सावली येथील भंगार विक्रेते मधुकर बापू मेडपल्लीवार यांना विकले होते. पोलिसांनी ४५००० हजार रुपये किमतीचे चोरीचे सर्व ९ व्हॉल्व्ह जप्त केले. पोलिसांनी आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३७९आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले. सदरची कारवाई मान. पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी, मान.अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, मान.उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार आशिष बोरकर यांच्या नेतृत्वात पोलिस उप निरीक्षक.लक्ष्मण मडावी व पो.कॉ.चंद्रशेखर गंपलवार यांनी केले.



