मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाविरोधात माकप व किसान सभेचे वणी येथे भरपावसात निदर्शने आंदोलन
वणी : भाजप च्या मोदी केंद्र सरकारने कोरोना संक्रमण चे काळात लावलेल्या लॉकडाउन मध्ये मोठ्या प्रमाणावर जनविरोधी धोरणे, कायदे राबवून सामान्य जनतेलाच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेला खाली आणून देशातील जनतेला भुखमरी वर आणले आहे. कामगार, शेतकरी,शेतमजूर, असंघटित कामगार, छोटे व्यावसायिक पूर्णपणे देशोधडीला लागले आहेत, त्या मुळेच देशपातळीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व किसान सभेच्या वतीने ९ आगस्ट क्रांतिदिनी व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणाच्या निषेध करून जनविरोधी धोरणे रद्द करा किंवा खुर्च्या खाली करा हा नारा देत वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर भरपावसात निदर्शने आंदोलन कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी व दिलीप परचाके यांचे नेतृत्वात करण्यात आले.
शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती करा, राष्ट्रीयीकृत बँकांकडून शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज ताबडतोब द्या,घरगुती व कृषिपंपाची वीज बिल माफ करा, २०२० चे वीज विधेयक रद्द करा,युरिया ची कृत्रिम टंचाई दूर करून शेतकऱ्यांना युरिया उपलब्ध करून द्या, आदिवासी व इतर शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावण्या पासून कंपन्यांना रोखा व CAMPA कायद्याच्या नावाखाली बळजबरीने वनजमिनीवर झाडे लावणे बंद करा, प्रत्येक पिकाला उत्पादन खर्च अधिक ५०% नफा हमीभाव जाहीर करा व हमीभावा पेक्षा कमी दरात खरेदी करणार्यांवर गुन्हे दाखल करा, पेट्रोल, डिझेल व गॅस चे भाव निम्म्याने कमी करा, लाभार्थ्यांमध्ये वर्गवारी न करता प्रत्येक कुटूंबाला दरमहा 20 किलो धान्य, १ ली तेल, १ की डाळ, १ की साखर देण्यात यावे, केंद्र सरकारच्या मोफत धान्य वाटपात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करा, महसूल, देवस्थान व वनविभागाच्या जमीन वरील अतिक्रमण धारकांना जमीनी वरून हटविणे व त्रास देने बंद करा, लॉकडाउन काळात प्रत्येक कुटुंबाला दरमहा ७५०० ₹ आर्थिक मदत द्या, आदिवासी जनतेला मिळणारी खावटी ताबडतोब द्या, केंद्र सरकारने घेतलेले नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा व ऑनलाइन शिक्षण पद्ध्ती रद्द करा आदि मागण्या ह्या आंदोलनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
या वेळेस वणी पोलीस विभागाचे पी एस आय फटींग साहेब यांना मागण्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले.
ह्या आंदोलनात ग्रामीण कार्यकर्त्यांनी पाऊस सुरू असतानाही सहभागी होऊन आंदोलनाला यशस्वी केले.कॉम्रेड शंकरराव दानव, कुमार मोहरमपुरी,दिलीप परचाके, विप्लव तेलतुंबडे, कवडू चांदेकर, गजानन ताकसांडे, संजय कोडापे, अशोक येल्लावार, अशोक गेडाम,मनोज काळे,ऋषि कुलमेथे, शंकर भगत आदीं प्रामुख्याने हजर होते.



