शिवाजी विज्ञान महाविद्यालय, वरोरा येथे संविधान दिन उत्साहात साजरा!
वरोरा : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या वतीने शिवाजी विज्ञान महाविद्यालय, वरोरा येथे 26 नोव्हेंबरला संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन वरोरा तालुका समतादूत रमेश मडावी यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीपप्रज्वलन करून अभिवादनाने करण्यात आली. यावेळी समतादूत रमेश मडावी यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे महत्त्व विशद करताना संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूलभूत तत्त्वांवर सविस्तर मार्गदर्शन केले. संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार, कर्तव्ये तसेच सामाजिक न्याय आणि लोकशाही मूल्यांचे जतन करण्याची जबाबदारी याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.
याप्रसंगी शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्य ज्योती मोगरे मॅडम यांना भारतीय संविधानाची प्रत आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. त्यानंतर महाविद्यालय परिसरातून संविधान जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीद्वारे संविधानाचे महत्त्व आणि लोकशाही मूल्यांचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी सामूहिक संविधान वाचन करण्यात आले. संविधानाच्या मूल्यांचे पालन करण्याचा संकल्प करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बार्टीचे महासंचालक, विभागप्रमुख जोगदंड सर, प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले सर तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य ज्योती मोगरे मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
संविधान दिनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासोबतच लोकशाही, सामाजिक समता आणि बंधुतेचा विचार रुजविण्याचा महत्त्वपूर्ण संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.



