विज पडून एक मृत्युमुखी तर पाच जखमी
मूल तालुक्यातील चांदापूर हेटी येथे विज पडून एकाचा मृत्यु तर चार जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी 2 वा. चे दरम्यान घडली.
घराकडे परत जात असताना अचानक नैसर्गिक वातावरण खराब झाल्याने प्रमोद लोमाजी लाटेलवार, संजय मारोती नरूले, विनोद सदोबा पाल, वसंत प्रकाश तिवाडे, बाळु तुकाराम तीवाडे आणि येलप्पा श्रीगिरीवार हे गावालगतच्या चिंचेच्या झाडाखाली उभे होते. दरम्यान विजांचा कडकडाटात सहा जण उभे असलेल्या चिंचेच्या झाडावर विज पडल्याने प्रमोद लोमाजी लाटेलवार (32) याचा घटनास्थळीच मृत्यु झाला तर उर्वरीत पाचही जण जाखमी झाले. घटनेची माहीती होताच ग्रामस्थांनी धावापळ करुन जखमींना सहकार्य करून उपचारार्थ उप जिल्हा रुग्णालयात हलविले. मृतक प्रमोद लाटेलवार हा विवाहीत युवक गांवालगतच्याच एका बार मध्ये नोकर होता प्रमोदच्या अंगावर विज पडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यु झाला. त्याच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे. घटनेची माहीती होताच प्रभारी उपविभागीय अधिकारी तथा तहसिलदार डॉ. रविंद्र होळी यांनी सहका-यांसह घटनास्थळी भेट दिली. मृतक प्रमोद लाटेलवार याच्या कुटूंबास व जखमींना नियमानुसार आर्थिक मदत करणार असल्याचे सांगीतले जात आहे.



